मडूरा पुलाचे झालेले अर्धवट काम वादात | …अन्यथा उपोषण छेडणार

61

माजी उपसरपंच उल्हास परब यांचा इशारा

बांदा : मडुरा माऊली मंदिर पुलाच्या दुतर्फा चिखलाचे साम्राज्य झाले असून पाच पेक्षा जास्त अपघात झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ खडीकरण करून त्यावर क्रश टाकत धन्यता मानली. मात्र येथून ये-जा करणाऱ्या शालेय विद्यार्थी, नागरिकांसह वाहनचालकांना मात्र तारेवरची कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे हलकासा पाऊस पडला तर पायी चालणेही मुश्किल बनले आहे. नवीन पुलासाठी उपोषण छेडले आता चिखलासाठी पुन्हा उपोषण छेडावे लागेल का? असा सवाल शिवसेना उपविभागप्रमुख तथा मडुरा माजी उपसरपंच उल्हास परब यांनी प्रशासनास केला आहे. पावसाळ्यात मडुरा माऊली मंदिर जुने पुल नेहमी पाण्याखाली जात असे.

नवीन पुलासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी तीव्र लढा दिला अन त्याला यश आले. पुलाचे काम तर चांगले झाले मात्र दुतर्फा मात्र फुटभर चिखलातून, विद्यार्थ्यांना, वाहनचालकांना वाट काढावी लागत आहे. रविवारी कार, रिक्षा सारखी वाहने तर अडकून पडली होती. अपघात टाळण्यासाठी महिलांनी दुचाकी एका बाजूने उभी करून चालत येणे पसंद केले. तर याच ठिकाणी आजपर्यंत पाच अपघात झालेत, याची माहिती बांधकाम विभागाला देऊनही ठोस पाऊल उचलले जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मातीच्या भरावावर खडीकरण करण्यात आले आहे. अपघातास सुरूवात झाल्यानंतर त्यावर क्रश (माती) टाकण्यात आली. बेशिस्त नियोजनामुळे कोट्यवधी रुपयांच्या मडुरा माऊली मंदिरावर अपघात घडत असून याला सर्वस्वी जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग आहे. पावसाळ्याच्या सुरूवातीलाच अशी अवस्था झाल्याने पुढे किती अपघात प्रशासन घडवणार? आठ दिवसांत योग्य उपाययोजना न केल्यास पुन्हा एकदा उपोषण छेडणार असल्याचा इशारा मडुरा माजी उपसरपंच उल्हास परब यांनी दिला आहे.

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता, पुलाच्या दतर्फा खडीकरण केले आहे. खडीकरणावर चिखल झाल्यामुळे त्यावर क्रश टाकण्यात आली आहे. पावसाळ्यानंतर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता वैभव सगरे यांनी सांगितले.