नेपाळ : नेपाळमधील पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक सकाळी ‘येति एअरलाईन्स एअरक्राफ्ट’ च्या विमानाला अपघात झाल्यामुळे ४० लोकांचा दुर्दैवी अंत झाला आहे. या विमानात पाच भारतीय प्रवासीदेखील असल्याची माहिती समोर आली आहे. दुर्घटना स्थळी बचावकार्य वेगात सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. नेपाळची राजधानी काठमांडू येथून उड्डाण केलेल्या या विमानात एकूण ७२ जण प्रवास करत होते. त्यापैकी ६८ प्रवासी तर ४ जण विमानातील कर्मचारी होते. पश्चिम नेपाळमधील पोखरा येथे जुन्या आणि नवीन विमानतळांच्यामध्ये हे विमान कोसळून ही दुर्घटना झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
या अपघातग्रस्त विमानात दोन लहान मुलांसह १० परदेशी नागरिकही प्रवास करीत होते. प्रवाशांमध्ये ५३ नेपाळी, ५ भारतीय, ४ रशियन, २ कोरियन, आयर्लंड, फ्रान्स, अर्जेंटिना आणि अफगाणिस्तानच्या प्रत्येकी एका नागरिकाचा समावेश होता. या घटनेनंतर नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांनी तातडीने कॅबिनेटची बैठक बोलाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. सर्व यंत्रणांना बचावकार्यात सहकार्य कारण्याचे आदेशही प्रचंड यांनी दिले आहेत.



