कणकवली पोलिसांची सतर्कता ; त्या विक्रेत्यांपर्यंत पोहोचत चौकशी सुरू
माहिती नोंदविण्यासाठी आधारकार्ड सह पोलीस ठाण्यात हजर राहण्याच्या सूचना
कणकवली : अलीकडेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात छोटी खेळणी विकणारे परप्रांतीय दाखल झाले आहेत. दिवसेंदिवस यायची संख्या वाढू लागल्याने कणकवली पोलिसांनी कणकवली शहरातील अशा परप्रांतीयांची चौकशी सुरू केली असून ठिक – ठिकाणी त्यांनी थाटलेल्या दुकानांवर जात चौकशी करून त्यांना त्यांचे आधार कार्ड घेऊन माहिती नोंदणीकरिता पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कणकवली तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून बहुतांश गुन्हेगार हे परप्रांतीय असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सतर्कता म्हणून जिल्ह्यात दाखल झालेल्या परप्रांतीयांकडून त्यांची वैयक्तिक विचारपूस व माहिती नोंदणीकरिता कणकवली पोलीसांनी त्यांना पोलीस ठाण्यात आधारकार्ड सह हजर राहण्यास सांगितले. तसेच असे जर कोणी आपल्या आजूबाजूच्या परिसरात आढळले तर सावधगिरी बाळगण्याचे आवाहन देखील पोलिसांच्यावतीने करण्यात येत आहे.





