कणकवली बसस्थानक परिसर चिखलमय | प्रवासी वर्गाला कसरत करत करावी लागतेय ये – जा

104

पावसाला सुरुवात नाही तत्पूर्वी परिसर झाला चिखलमय

कणकवली | मयुर ठाकूर : जिल्ह्यातील महत्वाची आणि मध्यवर्ती बाजारपेठ म्हणून कणकवली बाजारपेठ ओळखली जाते. बाजाराला बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या पाहिली तर ती सर्वाधिक आहे. असे असताना सर्वाधिक लोक जेव्हा बसने प्रवास करून जेव्हा कणकवली बस स्थानकात उतरतात तेव्हा त्यांना बसमधून उतरल्यावर चिखलातून ये – जा करावी लागते. कारण कणकवली बसस्थानकात साधारणपणे एक ते दिड फूट खोलीचे खड्डे पडलेले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, एक वर्ष पूर्ण झाले तरीही कणकवली बसस्थानकाचा परिसर काही चिखलमय रूप सोडताना दिसत नाही. याच झालंय अस की, कुठेतरी मीडिया च्या माध्यमातून किंवा वृत्तपत्रातून बातम्या प्रसारित झाल्या की तात्पुरती आश्वासने देऊन प्रसिद्धी पत्रकातून वाह..! वा…! मिळवायचा. मात्र प्रत्यक्षात कार्यवाही काही करायची नाही.

मागील एक वर्षापासून कणकवली बसस्थानक परिसरात साधारणपणे एक – दीड फूट पडलेल्या खड्ड्यांचा पोलखोल करण्यात आला होता. त्यावेळी मात्र पावसाचे कारण आणि निधी उपलब्ध नसल्याचे कारण देत प्रशासनाने आणि संबंधित अधिकाऱ्यांनी बाजू मारली होती. मात्र २०२३ या वर्षात पावसाला तेवढी सुरुवात झाली नसताना देखील पुन्हा एकदा बसस्थानकात त्याच ठिकाणी खड्डे निर्माण झालेत. याला बेजबाबदारपणा नक्की कोणाचा म्हणायचा.? जर प्रशासनाने आणि यंत्रणेने जबाबदारीपूर्वक याकडे लक्ष दिले असते तर हे दुसऱ्या वर्षीही घडलं नसतं. मात्र ऐन वेळी जाग येणाऱ्या ह्या झोपी गेलेल्या प्रशासनाला आणि अधिकाऱ्यांना करायचे तरी काय असा प्रश्न बसने ये – जा करणाऱ्या प्रवासी वर्गातून उपस्थित केला जात आहे. बाजूने जर चालवताना बस गेली तर साधारणपणे पूर्ण अंग त्या चिखलाने भिजून अंगावरील कपडे खराब होतात. आता शाळा कॉलेज सुरू झाल्याने बस स्थानकात मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थ्यांची ये – जा असते. त्यांना या खड्ड्यांचा नाहक त्रास सहन करावा लागतो.

 

अनेक लोकप्रतिनिधिंनी, नेत्यांनी, राजकिय पुढाऱ्यांनी कणकवली बसस्थानक व परिसर लवकरच सुशोभीकरण आणि सुस्थितीत करण्यात येणार असल्याची आश्वासने दिली होती. मात्र तीही आश्वासने फोटोग्राफी आणि प्रसिद्धिमध्ये अडकल्याचे चित्र पहिल्या सुरु न सुरू झालेल्या पावसाळ्यात दिसून आली.

त्यामुळे आता प्रशासन योग्य ते पाऊल उचलून बसस्थानक परिसरात निर्माण झालेला चिखलमय भागावर चिरे टाकून पुन्हा सालाबादप्रमाणे मलमपट्टी करणार की त्यावर काही उपाय करणार याकडे सर्व प्रवाश्यांचे लक्ष लागून राहिले आहे.