कणकवली : तालुक्यातील नडगीवे बौद्धवाडी येथे एका संशयित आरोपीने आपल्याच नात्यातील मुलावर शिवीगाळ करीत गॅस कंदील मारून त्याला जखमी केले आहे. हा प्रकार १० जूनला रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडला असून याप्रकरणी संशयित आरोपीवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंद संजय जाधव (३५,रा. नडगिवे,बौद्धवाडी) असे त्या संशयीत आरोपीचे नाव आहे. या घटनेत अभिषेक जाधव हा जखमी झाला आहे . या प्रकरणी सुनील धाकला जाधव (५१,रा.नडगीवे, बौद्धवाडी) यांनी कणकवली येथील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
यात म्हटले आहे की, नडगिवे, बौद्धवाडी येथे आपण सामाईक घरामध्ये पती-पत्नी, मुले असे राहतो. याच घराच्या दुसऱ्या भागामध्ये संशयित आरोपी आनंद जाधव यांची पत्नी आणि मुलगा असे राहतात. आपला लहान भाऊ मंगेश जाधव यांचा मुलगा अर्णव (७) हा आजारी होता. मुंबईत त्याला ताप आल्याने त्याचा मृत्यू झाला होत. त्यामुळे नातेवाईक अर्णव याचा मृतदेह घेऊन गावाकडे येत होते. यावेळी या अर्णवच्या मृतदेहाची तयारी सुरू असताना अचानकपणे वरील संशयित आरोपी आनंद याने सर्वांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आपल्याला टेन्शन आले आहे. म्हणून आपण शिवीगाळ करतो असे तो म्हणत होता. शिवीगाळ करू नको अशी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता. त्यांनी सुनील जाधव यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.त्यांची पत्नी व मुले त्यांना सोडवण्यासाठी आली होती. याचवेळी आनंद याने अभिषेक याच्या डोक्यावर गॅस कंदील मारून त्याला जखमी केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे.





