कर्करोग रुग्णांना मिळणार घराजवळ सुविधा…!

मुंबई : कर्करोग झालेल्या रुग्णांना उपचारासाठी मुंबईतील टाटा रुग्णालयात किंवा खाजगी रुग्णालयांकडे धाव घ्यावी लागते. मात्र टाटा रुग्णालयातील प्रतीक्षा यादी पाहता रुग्णांना बराच काळ तात्काळावे लागते. खाजगी रुग्णालयांतील उपचार परवडणारे नसल्याने रुग्णांची अवस्था अधिकच बिकट होते. मात्र यापुढे कर्करोग झालेल्या रुग्णांना घराजवळ उपचार मिळणार आहेत. मुंबईतील चार डॉक्टरांनी एकत्र येऊन मुंबई ऑनको केअर केंद्राची स्थापना केली असून त्यामाध्यमातून कर्करोगाच्या रुग्णांना त्यांच्या घरातच उपचार करण्यात येणार आहेत.

त्यामुळेच आजच्या घडीला महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील १० शहरांमध्ये १६ ठिकाणी हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राला कर्करोग रुग्णांकडून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे आता या चार डॉक्टरांसह आणखीन १५ अन्कॉलॉजी डॉक्टरांनी एकत्र येऊन देशाच्या कानाकोपऱ्यात हे केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुढील १८ महिन्यांत १८ केंद्रे देशाच्या पश्चिमेकडील राज्यांत म्हणजेच गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्र या राज्यांत सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी मुंबई ऑनको केअर केंद्रातर्फे नुकताच टाटा कॅपिटलशी सहकार्य करार करण्यात आला. त्यातून जवळपास १० दशलक्ष अमेरिकन डॉलर इतका निधी जमा करण्यात आला आहे. हा निधी या केंद्राच्या वाढीसाठी तसेच रुग्णांना देण्यात येणारी आरोग्य सुविधा ही अधिकाधिक स्वस्त व माफक दरात पुरवण्यासाठी वापरण्यात येईल. जेणेकरून सर्वसामान्य रुग्णांनाही कर्करोगाचे उपचार घेणे परवडेल, अशी माहिती मुंबई ऑनको केअर केंद्राचे संचालक डॉ. आशिष जोशी यांनी दिली.