काखेत कळसा गावाला वळसा… कणकवलीकरांची झाली पाण्याविना दैनावस्था.!

161

काही गावांमध्ये जलजीवन मिशन च्या विहिरी असूनही जनता पाण्याविनाच | काम का रखडली .? | जिल्ह्याची टँकर मुक्ती गेली कुठे ?

कणकवली | मयुर ठाकूर : उन्हाळा सुरू झाला आणि गडनदी पात्रातील पाण्याची पातळी हळूहळू कमी होऊ लागली. दरवर्षीप्रमाणे गड नदीपात्रात काही ठिकाणी लोखंडी प्लेट्स लावून पाणी अडविले जायचे. मात्र पाणी अडविणाऱ्या प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे प्लेट्स लिकेज होऊन मोठ्या प्रमाणात कधी नाही ती पाणीटंचाई कणकवली शहरासह आजूबाजूच्या गावांमध्ये जाणवू लागली. कणकवली, हळवळ, वागदे, कलमठ या गावांमध्ये सर्वात मोठी पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

एकीकडे प्रशासन सांगतय शिवडाव धरणाचे पाणी मंगळवार पर्यंत कोणत्याही परिस्थितीत कणकवली गडनदी पात्रात दाखल होईल. मात्र गुरुवारचा दिवस उजाडत आला तरी गड नदीपात्रात काही पाणी पोहोचलेले नाही. त्यामुळे पाणी टंचाईला सामोरे जात कणकवली मधील रहिवाशांना सलग तीन दिवसाच्या पाणी टंचाईनंतर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. साधारणपणे ३५०० लि. २५०० रु. ने विकत घेण्याची वेळ आली. हे झोपी गेलेले प्रशासन जागे होऊन गड नदीपत्रावर जेवढे काही पाणी अडविण्याचे बंधारे आहेत ते नेमके याच वर्षी कसे काय लिकेज झाले ? अन् अडवलेले पाणी वाहून कसे गेले ? याची चौकशी लावून यापुढे अशा प्रकारची परिस्थिती उद्भवणार नाही याची खबरदारी घेणार का ? की सालाबादप्रमाणे हीच परंपरा सुरू ठेवणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

अगदी नदी काठावर असलेली गाव देखील यावर्षी पाण्याविना आहेत हे दुर्दैव.! तर काही गावांमध्ये जलजीवन मिशन च्या विहिरी चे काम पूर्ण होऊन देखील काही गाव पाण्याविना आहेत. एकीकडे हा कडक्याचा उन्हाळा आणि दुसरीकडे उद्भवलेली पाणीटंचाई याने सर्वसामान्य लोक संतप्त झाले आहेत. जलजीवन मिशन च्या विहिरी ची काम पूर्ण झाली आहेत. मात्र ठेकेदारांच्या कमजोरीपणामुळे काहीशी काम रखडून राहिली आहेत. तर काही ठेकेदार बिल रखडल्याचे कारण देत आहेत त्यामुळे काही गावांमध्ये जलजीवन मिशन च्या विहिरींची काम पूर्ण झाली असून पण गाव पाण्याविना आहे.