तिन्ही मंत्र्यांकडून जागेची पाहाणी | ६ जूनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुदुर्गात
कुडाळ : “शासन आपल्या दारी” या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ६ जूनला सिंधुदुर्गात येणार आहेत. हा कार्यक्रम भूतो न भविष्यती असा करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज येथे दिली. मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज तीनही मंत्र्यांनी कुडाळात दाखल होत कार्यक्रम स्थळाची पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना श्री. चव्हाण यांनी माहिती दिली. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर,भाजप नेते निलेश राणे, आमदार रवींद्र फाटक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, तालुकाप्रमुख बंटी तुळसकर, उपतालुका प्रमुख अरविंद करलकर यांनी कुडाळ हायस्कूल मैदान या कार्यक्रमस्थळी भेट देवून पाहणी केली. तसेच याबद्दल इव्हेंट कंपनीला आवश्यक त्या सूचना केल्या. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, हा कार्यक्रम न भूतो न भविष्यती असा होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्य उपस्थिती असेल. ‘शासन आपल्या दारी’ या योजना जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे. यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. या कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्हयातील नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.





