ओटीटी प्लॅटफॉर्मवरून प्रसिद्ध होणाऱ्या चित्रपट, सीरिजमधून अनेकदा धुम्रपान, मद्यपानाची दृश्ये दाखवली जातात. यामुळे धुम्रपान आणि मद्यपान सेवनाचा प्रसार होऊ शकतो. यावर प्रतिबंध घालण्याकरता केंद्र सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर तंबाखूविरोधी चेतावणी (Anti-Tobacco Warnings) देण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. तसं न केल्यास संबंधित निर्मात्यांवर कारवाई करण्याचा इशाराही केंद्राने दिला आहे. असा नियम पारीत करणारा भारत हा पहिला देश ठरला आहे.
आज, ३१ मे रोजी जागतिक तंबाखू विरोध दिन साजरा केला जातोय. त्यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ही अधिसूचना जारी केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि इतर भागधारकांशी चर्चा केल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने OTT प्लॅटफॉर्मवर तंबाखूविरोधी इशाऱ्यांसाठी नवीन नियम तयार केले आहेत.





