भाजप जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम यांचे निधन..!

768

देवगड : भारतीय जनता पार्टीचे सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस तथा इळये ग्रामपंचायत माजी सरपंच जयदेव भास्कर कदम ५० यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्यांने मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास निधन झाले.जयदेव कदम हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने शिरगाव येथे आले होते.गेली चार वर्षे ते किडणीच्या आजाराने त्रस्त होते.आज सकाळीच ते डायलिसिस करून दुपारी शिरगाव येथे घरी आले.

त्यानंतर त्यांच्या छातीत अचानक दुखू लागले त्यामुळे त्यांना शिरगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, असा परिवार आहे.

जयदेव कदम यांच्या निधनाची बातमी समजतात भाजपा आमदार नितेश राणे,माजी आमदार अँड अजित गोगटे यांनी पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या समवेत त्याच्या शिरगाव येथे भेट देत पार्थिवाचे दर्शन घेतले . तसेच इळये येथील कदम यांच्या निवासस्थानीही सर्व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली.
लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धडे घेतलेल्या जयदेव कदम यांनी देवगड तालुका भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष , सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा जिल्हा सरचिटणीस, देवगड तालुका खरेदी विक्री संघ चेअरमन संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष,इळये ग्रामपंचायत सरपंच,इळये शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, इळये आरोग्य समिती अध्यक्ष पद अश्या सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी विविध पदांवर उल्लेखनीय कामगिरी करत आपल्या कार्याचा वेगळा ठसा त्यांनी उमटविला होता.

सर्वच राजकीय पक्षांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते . राजकिय सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन काम करणारा नेता म्हणून जयदेव कदम यांची विशेष ओळख होती. अचानक त्यांच्या निधनाची बातमी आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ईळये येथील स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी अंत्यसंस्कार होणार आहेत.