यवतमाळ : सध्या कापसाला योग्य हमीभाव नाही. जिनिंगमध्ये रुईच्या गाठी पडल्या आहेत. गिरण्यांमध्ये कापसाचा धागा पडून आहे. यामुळे कापूस पीक धोक्यात आले आहे. केंद्र सरकारने कापूस उत्पादकांच्या जीवावर न उठता कापसाला तत्काळ नऊ हजार रुपये प्रति क्विंटल हमी भाव द्यावा, अशी मागणी शेतकरी नेते विजय जावंधीया यांनी पांढरकवडा येथे कापूस होळी सत्याग्रहात केली.
पांढरकवडा येथील तहसील चौकात शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत कापूस होळी आंदोलन करण्यात आले. यावेळी विजय जावंधीया म्हणाले, केंद्र सरकारने ५० लाख खंडी रुई ७० हजारच्या दराने बाजारातून विकत घ्यावी. त्यावर अनुदान देऊन त्याची निर्यात केल्यास भारतातील कापसाची मंदी दूर होऊ शकते. अन्यथा, पुढील वर्षीही कापूस उत्पादक शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात येतील. केंद्र सरकारने हा विषय गंभीर्याने घेऊन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही जावंधीया यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांच्या वतीने सरकारला केली.




