कणकवली : कर्ज देण्याचे आमिष दाखवून मठकर यांना शहरातील दत्ता तब्बल साडेपाच लाख रुपयांना ऑनलाईन गंडा घालण्यात आला. तिघांविरोधात कणकवली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील साईनगर वरचीवाडी येथे राहणाऱ्या दत्ता बाबू मठकर (४४) यांना १७ एप्रिल ते ८ मे या कालावधीत मोहीत, अंकुश वर्मा, नेहा वर्मा (पूर्ण नाव माहीत नाही) यांनी फोन करून २६ लाख कर्ज मंजूर करून देतो, असे सांगितले. यासाठी लागणारी फी मंजूर कर्जासोबत रिफंड होईल, असे सांगितले.
त्यानुसार मठकर यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून वेळावेळी लॉगीन फी, इन्शुरन्स फी, आयटी रिटर्न रक्कम वाढविणे, एटीएम कार्ड फी, आगाऊ कर्ज हप्ता, कर्ज त्रुटी पूर्तता, टीडीएस आदीसाठी मिळून या तिघांनी ५ लाख ३६ हजार ८४४ रुपये एवढी रक्कम भरून घेतली. ही रक्कम मठकर यांनी रिलायन्स कॅपिटल फायनान्स, फिनो बँक व डीबीएस या बँकांच्या खात्यात वेगवेगळ्या दिवशी ऑनलाईन जमा केली. एवढे करूनही कर्जाची रक्कम मिळेना. त्यावेळी मठकर यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांनी कणकवली पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यानुसार मोहीत, अंकुश वर्मा, नेहा वर्मा अशी नावे सांगितलेल्या व्यक्तींवर भादंवि कलम ४२०, ३४ सह माहिती व तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. जिल्ह्यात विविध आर्थिक प्रलोभने दाखवून ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढतच असून याबाबत सतर्क राहणे आवश्यक झाले आहे.





