नियोजन, सातत्यपूर्ण अभ्यास व सुयोग्य मार्गदर्शन हीच यशाची त्रिसूत्री : प्रा.राजाराम परब

सिंधुदुर्गनगरी : कोणतीही स्पर्धा परीक्षा ही उत्तीर्ण होणे अवघड किंवा अशक्य नसते. विद्यार्थ्यांनी योग्य नियोजन, सातत्यपूर्ण अभ्यास व सुयोग्य मार्गदर्शन घेतले तर निश्चितच स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन करता येते, असे प्रतिपादन परफेक्ट अकॅडेमीचे सर्वेसर्वा प्राध्यापक राजाराम परब यांनी केले.
गोवा येथील काणकोण येथे परफेक्ट अकॅडेमी व केशव सेवा साधना, गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या काणकोण टॅलेंट सर्च स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी प्राध्यापक परब बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केशव सेवा साधनाचे कार्यवाह लक्ष्मण उर्फ नाना बेहेरे, सहकार्यवाह तथा माजी मुख्याध्यापक श्रीकृष्ण देसाई, सेवानिवृत्त पशुधन विकास अधिकारी डॉ. एम. आर. परब, टीजेएसबी बँकेचे रिजनल मॅनेजर अरुण भट आदी उपस्थित होते.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून बक्षीस वितरण समारंभाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी तालुक्यातील यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

कार्यक्रमास उपस्थित असलेले नाना बेहेरे म्हणाले, परफेक्ट अकॅडेमीच्या माध्यमातून आगामी काळात काणकोणच नव्हे तर संपूर्ण गोव्यातील विद्यार्थ्यांना नीट व जेईई सारख्या स्पर्धा परीक्षांची सुयोग्य तयारी करण्यासाठी केशव सेवा साधना विशेष प्रयत्न करणार आहे. गोव्यातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड बुद्धिमत्ता असूनही सुयोग्य मार्गदर्शन नसल्यामुळे ते अशा स्पर्धा परीक्षेत मागे पडतात, ही उणीव सातत्याने जाणवत असल्यामुळेच प्रा. राजाराम परब यांच्या माध्यमातून संपूर्ण गोवा राज्यात स्पर्धा परीक्षांची क्रांती होणार आहे, असा आशावाद श्री. बेहरे यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमास उपस्थित असलेले टीजेएसबी बँकेचे रिजनल मॅनेजर अरुण भट यांनीही मनोगत व्यक्त केले.

प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक राजाराम परब यांनी उपस्थित मुख्याध्यापक, विद्यार्थी व पालकांना नीट, जेईई या परीक्षांच्या तयारीसाठी लागणाऱ्या विविध गोष्टी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारा अत्यंत सोप्या भाषेत समजावून दिल्या. यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. परब पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या करिअरच्या महत्त्वपूर्ण टप्प्यात पालकांनीही सजग राहणे क्रमप्राप्त आहे. कोणत्याही परीक्षेचा अतिरिक्त ताण न घेता सुयोग्य नियोजन, सातत्यपूर्ण अभ्यास आणि योग्य मार्गदर्शन या त्रिसूत्रीने यशाला गवसणी घालता येते. आगामी काळात गोवा राज्यातील विद्यार्थ्यांना सुयोग्य व अल्प दरात मार्गदर्शन करून त्यांच्या यशासाठी परफेक्ट अकॅडेमी व केशव सेवा साधना प्रयत्नशील राहतील, अशीही ग्वाही प्रा. परब यांनी यावेळी दिली.
दरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी काणकोण तालुक्यातील तब्बल ३०० विद्यार्थी व विविध शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक यांचा परफेक्ट अकॅडेमीच्या वतीने सन्मानचिन्ह, मेडल, प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी अंकिता परब, अक्षय कानडे, परिमल धुरी तसेच केशव सेवा साधना, गोवा यांच्या अनेक स्वयंसेवकांनी प्रयत्न केले. शेवटी उपस्थित विद्यार्थी व पालकांना खाऊ वाटप करण्यात आला.

परफेक्टच्या अठराव्या शाखेचेही उद्घाटन..

दक्षिण भारतातील आणि कोकणातील अग्रगण्य असलेल्या परफेक्ट अकॅडेमीच्या अठराव्या शाखेचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
तामिळनाडू, कर्नाटक, पश्चिम महाराष्ट्र आणि तळकोकणात याआधीच विविध शाखांच्या माध्यमातून परफेक्ट अकॅडेमीचे कार्य सुरू असून आता दक्षिण गोव्यातील काणकोण येथेही अठरावी शाखा सुरू करण्यात आली आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्राध्यापक राजाराम परब व टीम परफेक्ट अकॅडेमीचे अभिनंदन करून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.