रत्नागिरी : गेले काही दिवस बारसू रिफायनरीला स्थानिक ग्रामस्थ जोरदार आंदोलनाने आपला विरोध प्रकट करत आहेत . स्थानिकांना शिवसेना ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे. दरम्यान, बारसू रिफायनरी विरोधातील आंदोलनादरम्यान शिवसेना खासदार विनायक राऊत यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खासदार विनायक राऊत आंदोलकांची भेट घेण्यासाठी ते बारसूच्या सड्यावर गेले होते. तिथं त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान आजही रिफायनरी विरोधात आंदोलन सुरु आहे. या ठिकाणी प्रशासनाच्या विरोधात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
मोर्चासाठी मोठ्या संख्येने आजूबाजूच्या गावातील लोक जमले आहेत. त्यामुळे या भागात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. बारसू येथील महिला अधिक आक्रमक झाल्या आहेत. काहीही झालं तरी आम्ही येथून हलणार नाही. आम्हाला प्रकल्प नकोय. कोणीही प्रकल्पाची जबरदस्ती करु नये, असे सांगत महिला आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. आमचा जीव गेला तरी आम्ही हलणार नाही, असा निर्धार आंदोलन करणाऱ्या महिलांनी केला आहे. पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला आहे. आंदोलनकांची धरपकड करण्यात येत आहे. त्यामुळे हे आंदोलन अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.





