कोकणात आणायला यांना फक्त विनाशकारी प्रकल्पचं का दिसतात :अँड प्रसाद करंदीकर

71

देवगड : कोकणात उत्कृष्ट प्रतीचा आंबा काजू फणस रतांबा होतो.. त्यावर प्रक्रिया करणारा अमूल, चितळे फूड्स नंदिनी , गोकुळ, जैन फूड्स सारखा हजारो कोटी चा प्रकल्प आणा ना.. त्यांना SEZ उपलब्ध करुन द्या, कोकणात फूड प्रोसेस इंडस्ट्रिअल झोन बनवा.. मग बघा हजारो लाखो रोजगार निर्माण होतील.. लोक जमिनी द्यायला स्वतःहून तयार होतील..

कोकणात पर्यटनच्या संधी अनंत आहेत.. अफाट आहेत.. 12 महिने पर्यटन होऊ शकते.. तुम्ही सरदार पटेल पुतळा जर ओसाड केवडिया जिल्ह्यात करुन नर्मदेच्या वाळवंटात चमत्कार घडवू शकता तर बारसू मध्ये एखादा पंच तारांकित पर्यटन प्रकल्प कॉक्स आणि किंग्स, महिंद्रा हॉलिडे सारख्या दिग्गज कंपन्या ना आणून करा ना..कोकणात 100 पेक्षा जास्त किल्ले आहेत.. तुम्ही 1000 कोटी फक्त खर्च करा.. या किल्ल्याना सुशोभीत करा.. बघा लाखो हजारो रोजगार आपोआप निर्माण होतात की नाही…

देवेंद्र फडणवीस तुम्ही आता राज्यातील सर्वात हुशार आणि चाणाक्ष नेते आहात.. सर्वात पॉवरफूल देखील आहात..तुम्ही सांगताय की डायरेक्ट आणि इंडायरेक्ट रोजगार कोकणात निर्माण होतील.. त्यासाठी तुम्ही रिलायन्स जामनगर ची रिफायनरी आणि आंब्याची बाग याचे उदाहरण देताय.. अहो शेठ जामनगर एकही गरीब माणूस शिल्लक नाही आणि एकही झोपडपट्टी नाही असं शपथ पत्र तुम्ही घालू शकाल का..

कसं आहे.. आम्हाला रोजगार हवायं पण विकासाच्या नावाखाली गावच्या गाव उध्वस्त करणारा भस्मासूर नकोय..कोकणातल्या बेरोजगार मुलांच्या गरजा अगदी माफक आहेत ओ..आम्हाला हाताला कामं हवंच आहे. पण आमचीच घर दार उध्वस्त करुन नकोय.. आजही रात्री आम्हाला आमच्या खळ्यात बसून मोकळ आकाश दिसायला हव आहे.. आम्हाला आंब्याचा मोहोराचा, काजुचा, फंणसाचा सुगंध हवा आहे..

तुमची रिफायनरी झाली की आमच्या मुलांना रोजगार म्हणून फक्त चपराशी, वॉचमन, ड्रायव्हर आणि सफाई कामगार ह्याच नोकऱ्या मिळणार आहेत.. बाकीचं शिकायला कोकणात कॉलेज कुठे आहेत.. राहिला प्रश्न जोड धंद्याचा.. होणार ना.. जोड धंदे पण होतील. रिफायनरीच्या लोकांना दारू लागेल त्यासाठी बियर बार निघतील.. जमिनी मिळवून देणारे ईस्टेट एजंट तयार होतील.. कर्ज काढून घेतलेल्या मोठमोठ्या गाड्या भाड्याने लावून प्रदूषण पसरवणारे वाहतूक किंग येतील.. चका चक हॉटेल येतील.. बांधकामासाठी मोठं मोठ्या चिरे खाणी खाऊन जमिनीच पोट फाडल जाईल.. इतर अवैध उद्योग होतील..समुद्रात आमच्या गाबीत बांधवांच्या होड्या जाऊन सुपर फास्ट ट्रॉलर येतील.. मासळीची जन्माला आलेली पिल्लं सुद्धा पावसात पकडून श्रीमंत पाहुण्याला वाढली जातील..हि आणि अशी बरीच प्रगती केली जाईल..मारला जाईल तो फक्त निष्पाप कोकणी माणूस.. इथली निसर्ग संपदा आणि निरागसता..आम्हाला विकास हा शाश्वत हवाय.. भकास आणि उजाड करणारा नकोय..