कुडाळ : येथील पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यातील ७४ गावामध्ये एकाच दिवशी हागंणदारीमुक्त (ओडीएफ ++) प्रकल्प राबविण्यात येणार आहे. असा उपक्रम राबवणारी राज्यातील ही पहिली पंचायत समिती असून ३१ मार्च पूर्वी हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. दरम्यान पणदूर येथील संविता आश्रम येथे आज या प्रकल्पाचा शुभारंभ झाला.
कुडाळ पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या समितीचे सर्व विभाग विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यास नेहमीच राज्यपातळीवर अग्रेसर ठरले आहेत. यशवंतपंचायतराज अभियान, महाआवास अभियान ,बाबू लागवड, स्वच्छता अभियान, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव, विधवा प्रथा बंद, पाणी अडवा पाणी जिरवा उपक्रम आदी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले.
हे सर्व उपक्रम जिल्ह्यासह कोंकण व राज्यासाठी आदर्शवत ठरले आहेत. आता तर कुडाळ तालुक्यात ७४ गावात एकाच दिवशी हागंणदारीमुक्त (ओडीएफ प्लस प्लस) प्रकल्प राबविण्याचा उपक्रम हाती घेतला असून ३१ मार्च २०२३ पूर्वी हा प्रकल्प पूर्ण होणार आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी दिली.




