बांदा : कोकण रेल्वे मार्गावर मडुरा काळा आंब्याजवळ पहाटेच्या सुमारास गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या जलदगती रेल्वेची धडक बसून तीन गवे ठार झाल्याची घटना मंगळवारी पहाटेच्या घडली.
याठिकाणी बऱ्याचवेळा रेल्वेची धडक बसून गवे ठार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. वनविभागाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृत गव्यांची विल्हेवाट लावली.
मडुरा गावासह अनेक ठिकाणी कित्येक वेळा रेल्वेच्या धडकेने पाळीव तसेच रानटी प्राण्यांना जीव गमवावा लागला आहे. मंगळवारी पहाटे गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी एक्सप्रेस रेल्वे गाडीची धडक तीन गव्यांना बसली. यात चार वर्षाची मादी, दीड वर्षाचे वासरू जागीच ठार झाले. तर एक मोठा अंदाजे पाच वर्षांचा गवा रेडा गंभीर जखमी झाला. जखमी गवा रेल्वे मार्गालगत असलेल्या काजू बागेत सुमारे चार तास तडफडत होता. मात्र धकड जोरात बसल्याने अखेर त्याने आपले प्राण सोडले. काही काळ ग्रामस्थांमध्ये जखमी गवा पाहून भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
वनविभागाचे सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षिरसागर, तसेच वनपाल नागेश खोराटे, वनरक्षक संग्राम पाटील, आप्पासो राठोड, चंद्रकांत पडते, ग्रामस्थ रामदास केणी यांनी मृत गव्यांचा पंचनामा करत विल्हेवाट लावली.
दरम्यान, रेल्वे मार्गावर वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याने संरक्षक जाळी अथवा कुंपण बसविणे आवश्यक आहे. परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे यासंदर्भात लवकरच पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट घेणार असल्याचे मडुरा उपसरपंच बाळू गावडे यांनी सांगितले.





