कणकवलीतील पटवर्धन चौकात सायबर गुन्ह्यांविषयक जनजागृती.!

136

ऑनलाईन व्यवहार करताना सावधानता बाळगा ; उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे

कणकवली | मयुर ठाकूर : अलीकडेच सायबरसह फसवणुकीचे गुन्हे वाढले आहेत. पण सायबर गुन्ह्यांचा तपास होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. याच पार्श्वभूमीवर लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी सिंधुदुर्ग पोलिस दलातर्फे सायबर क्राईम जनजागृती अभियान राबविले जात आहे.

शनिवारी सायंकाळी कणकवली पटवर्धन चौकात सायबर गुन्ह्यांविषयक जनजागृती करण्यासाठी चित्रफीत दाखविण्यात आली. जनतेने ऑनलाईन व्यवहार करताना पूर्णपणे सावधानता बाळगावी. सायबर फसवणुकीच्या गुन्ह्याला बळी पडू नये, असे आवाहन कणकवलीचे डीवायएसपी विनोद कांबळे यांनी केले.

यावेळी कणकवली पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव, महिला हवालदार राणे, वाहतूक पोलिस विनोद चव्हाण, किरण मेथे, यांच्यासह सिंधुदुर्ग पोलिस दलाचे बँडपथक उपस्थित होते. यावेळी पोलीस पथकाचे बँड वाजवून लोकांना आकर्षित करण्यात आले. पोलिस व्हॅनवर चित्रफीत दाखविण्यात आली.

OLX वर वस्तू खरेदी – विक्री करू नये, कुणीही ऑनलाईन गुगलवर कस्टमर केअर हेल्पलाईन नंबर शोधू नये, कुणीही ऑनलाईन कर्ज घेवू नये, कुणीही अनोळखी व्हाट्सअँप कॉल स्विकारू नये, लाईट बील रात्री कट होईल असे खोटे मॅसेज ब्लॉक करावे, फेसबुक प्रोफाईल लॉक करावे, घरातील व्हिडीओ, फोटो त्यात टाकू नये, व्हिडीओ बघू शकतील असे करावे, कुणीही बँकेतून बालतोय असे सांगून आपले डेबिटकार्ड, क्रेडीटकार्डची केवायसी माहिती मागत असेल तर देवू नये, ऑनलाईन नोकरी सर्च करू नये, आपले पासवर्ड, डेबिटकार्ड, क्रेडीटकार्ड नंबर सगळे एका रजिस्टरमध्ये घरी लिहून ठेवावेत, ऑनलाईन फ्रॉड झाल्यास १० ते ६ वा. च्या दरम्यान १९३० वर फोन करून माहिती द्यावी किंवा ऑनलाईन तक्रार नोंदवावी, मोबाईलमध्ये आपले महत्वाचे पासवर्ड, डोक्युमेंटस् काहीच ठेवू नये, फेसबुक, इन्स्टाग्राफवरील आपले प्रोफाईल एडीट करून ओन्ली विथ फ्रेंड करावे, पब्लिक ऑफ फ्रेंड करू नये असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले.