सावंतवाडी | भगवान शेलटे :
गरीबी पाचवीलाच पुजलेली, वयाच्या ७ व्या वर्षी डोक्यावरून वडिलांचं छत्र हरपलं… आई काम करेल तेव्हाच घरात चूल पेटायची.. घरात शिक्षणाचा तसा कसलाही गंध नाही. अशा हलाखीची परिस्थितीत वाट काढत, परिस्थितीचा कधीही बावू न करता आलेल्या संकटाना सामोरे जात, परिस्थितीलाच जिद्द बनवत निगुडे गावातील जोत्स्ना नारायण पोखरे या युवतीने यशाला गवसणी घातलीय. तिची पोलीस दलात नियुक्ती झालीय. आता फक्त तिची पोलीस दलात निवड झालेली दिसत असली तरी यामागे तिची अपार मेहनत आणि कष्ट लपलेलं आहे.
वयाच्या ७ वर्षी हरवलं वडिलांचं छत्र
वयाच्या अवघ्या ७ व्या वर्षी जोत्स्नाच्या वडिलांनी जगाचा निरोप घेतला. कोकणातील सर्वसामान्य कुटुंबासारख हे कुटुंब. वडील गेल्यानंतर कुटुंबाचा भार आईवर. मात्र, तिच्या आईने सुद्धा परिस्थितीशी दोन हात करत जोत्स्नाचं शिक्षण पूर्ण केलं. तिला वेळोवेळी मानसिक, आर्थिक आधार दिला. हे करतना तिला अपार कष्ट सोसाव लागलंय.

५ वर्षें सुरु आहे प्रॅक्टिस
कोणत्याही परिस्थितीत पोलीस दलात जायचं हे जोत्स्नाने मनोमन ठरवलं होत. यासाठी गेली ५ वर्षे ती मेहनत घेत आहे. या वर्षात अनेक कठीण प्रसंगांना तिला तोंड द्यावे लागले. मात्र, तिने हार मानली नाही.

भरतीवेळी पायही झालेला फ्रॅक्चर
जोत्स्ना अनेक ठिकाणी भरतीसाठी जायची. एकदा तर तिच्या पायालाही गंभीर दुखापत झालेली. मात्र, त्याने ती अजिबात खचली नाही. कोरोनाकाळातही फारस तिला काही करता आलं नाही. असे अनेक अडथळे तिने पार करत ती ध्येयापर्यंत पोहचली.
कुटुंबासोबतचं शेजाऱ्यांनीही केली मदत
जोत्स्नाला आईसोबत तिच्या काका काकींचा मोठा आधार मिळाला. त्या सोबतच शेजारच्या अनेकांनी तिला जमेल तशी मदत केली. या यशात या सर्वांचा हातभार आहे असं ती अभिमानाने सांगते. त्याचबरोबर तिने शिक्षण घेतलेल्या विद्या प्रभोदिनीचाहि ती खास उल्लेख करते.

अगदी तरुणपणी आयुष्यात आलेल्या असंख्य चढउतारांचा सामना करत अखेर तिच्या मेहनतीचं चीज झालं असं म्हटलं तर ते वावग ठरू नये. जोत्स्नाने पोलीस दलातहि चमकदार कामगिरी करून निगुडे गावासह जिल्ह्याचं नाव रोषन कराव, त्याचबरोबर परिस्थितीमुळे धडपडणाऱ्या अशा अनेक मुलींना आधार द्यावा एवढचं.





