रुग्णांच्या जिवाशी खेळतोय कोण ? | रामभरोसे कारभार करतय कोण ? रुग्णसेवेकडे दुर्लक्ष कायमच…?

102

कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रश्ना पाठोपाठ कळसुलीतही ग्रामस्थ आक्रमक.!

आक्रमक ग्रामस्थांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला.!

कणकवली : तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय कणकवलीची दैना अवस्था कायमच असताना आता कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांच्या जीवावर बेतणाऱ्या घटना दिवसेंदिवस वाढू लागल्या असल्याने संतप्त ग्रामस्थांनी कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. तृप्ती देसाई यांना घेराव घालून जाब विचारला.

कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना मुदत संपलेल्या गोळ्या दिल्या गेल्याचा ग्रामस्थांनी ठपका ठेवला आहे. रुग्णांनी त्या गोळ्या काळजीपूर्वक बघितल्यामुळे पुढे होणारी घटना टळली. दोन दिवसापूर्वी डिलिव्हरी रुग्णाला देखील चुकीची औषधे देण्यात आली. या घटना ताज्या असताना, बुधवारी १२ एप्रिल रोजी रात्री कळसुली गवसेवाडी येथील एका महिला रुग्णाची प्रकृती अचानक खालावली असताना, कळसुली आरोग्य केंद्रात त्या महिलेला उपचारासाठी दाखल केले. दरम्यान डॉक्टर उपलब्ध नसल्याने व वेळीच उपचार न झाल्याने त्या महिला रुग्णाची प्रकृति खालावली. स्थानिक ग्रामस्थांनी धावाधाव करत कणकवली उपजिल्हा रुग्णालय रुग्णालय गाठले. सध्या त्या महिलेवर जिल्हा रुग्णालय ओरोस येथे उपचार सुरू आहेत.

कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. कुबेर मीठारे यांची तब्बल २० वर्षे कळसुली गावात चांगल्या प्रकारे सेवा दिली. डॉ मिठरी यांच्या बदलीनंतर डॉ. संजय पोळ यांची नियुक्ती झाली. माञ सध्या कळसुली प्रा. आरोग्य केंद्रात कायमसवरूपी डॉक्टर नसल्याने अनेकांना आपले जीव गमावण्याची वेळ आली आहे. कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. रुग्ण सेवेसाठी जनतेने निवडून दिलेले सेवेकरीही सफशेल फेल ठरले आहेत. वरिष्ठ अधिकारी देखील याकडे दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळत.

कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. तृप्ती देसाई यांचा ३१ मार्चला कार्यकाल संपला असून, डॉ. देसाई कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्राची जबाबाबरी सांभाळत आहेत. पुन्हा कळसुली गावातील रुग्णांच्या जिवाशी खेळला तर आम्ही खपवून घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा कळसुली ग्रामस्थांनी घेतला.

यावेळी माजी सरपंच अतुल दळवी, सामाजिक कार्यकर्ते सुशांत दळवी, ग्रामपंचायत सदस्य भारती देसाई, मधुकर चव्हाण, चंदू परब , नरेश दळवी, तंटामुक्ती अध्यक्ष दिलिप सावंत, गणेश पाडावे, सत्यवान परब, संतोष सुतार, बाबू कळसुलकर, लाडू गावकर, फ्रान्सिस फर्नांडिस, सह ग्रामस्थ उपस्थित होते. अशीच परिस्थिती जैसे थे राहिली तर तालुका अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन छेडणार असल्याची माहिती माजी सरपंच अतूल दळवी यानी दिली.