तहसिलदारांच्या लेखी पत्रामुळे सासोली ग्रामस्थांचे आंदोलन स्थगित…!

दोडामार्ग : सासोली ग्रामस्थांनी महसूल विरोधात व इतर विभागांच्या बेकायदेशीर कारभाराविरोधात येथील तहसील कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण तहसीलदार अरुण खानोलकर यांच्या लेखी आश्वासनाने मंगळवारी रात्री उशिरा स्थगित करण्यात आले आहे. लेखी आश्वासनं दिल्या प्रमाणे मात्र कार्यवाही न झाल्यास पुनश्च उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे

सासोली येथील सामायिक जमिनींपैकी काही जमिनींना महसुल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कायदे व नियम पायदळी तुडवुन ज्या अकृषिक सनदा दिल्या त्या रद्द करण्यासोबत अन्य मागण्यांच्या अनुषंगाने येथील तहसील कार्यालयासमोर सासोली ग्रामस्थांनी सोमवारपासून आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणाला विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भेट देऊन पाठिंबा दिला होता. तसेच आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे लक्ष या उपोषणाकडे वेधले होते. अकृषिक सनद रद्द करा. त्याचबरोबर अनधिकृत बनधकाम पाडा व तेथील जमिनीतबेसुमार वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई करा या मागणीसाठी हे उपोषण सुरू होते.

सोमवारी तहसीलदार खानोलकर यांनी सासोली येथे जागेवर जात पाहणी केली. त्यानंतर व सायंकाळी ६:३० वा. च्या सुमारास स्वतःच्या दालनात उपोषणकर्त्यांसमवेत बैठक घेतली. मंगळवारी देखील बैठक संपन्न झाली. उपोषणकर्ते आपल्या मागणीवर ठाम राहिल्याने प्रशासनास अखेर नरमाई घ्यावी लागली. मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास तहसीलदार अरूण खानोलकर यांनी उपोषणकर्त्यांना  विविध आश्वासनांचे पत्रे दिल्याने हे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस भाजपचे एकनाथ नाडकर्णी, बाबूराव धुरी, अन्य पदाधिकारी उपस्थित होते

पालकमंत्री व शिक्षणमंत्री यांचे लक्ष वेधले!!!

या प्रकरणी सासोली ग्रामस्थांचे उपोषण याबाबाबत एकनाथ नाडकर्णी यांनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे माध्यमातून लक्ष वेधले होते तर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी तहसीलदार यांना फोन करून सूचना दिल्या होत्या अशी माहिती गणेशप्रसाद गवस यांनी दिली.