तळवडेत रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…!

सावंतवाडी : श्री म्हाळाईदेवी कला क्रिडा मित्रमंडळ, व ग्रामस्थ आणि सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा सावंतवाडी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीच्या सहकार्याने आरोग्य उपकेंद्र तळवडे म्हाळाईवाडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी व्यासपीठावर डॉ.डी.पी.गावडे, श्री देवी म्हाळाईदेवी कला क्रिडा मित्रमंडळाचे सल्लागार प्रसाद गावडे, अध्यक्ष प्रविण लोके, उपाध्यक्ष शैलेश हरमलकर, सचिव सुशांत गावडे, खजिनदार भरत गावडे, सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान चे जिल्हा कार्यकारिणी सदस्य एकनाथ चव्हाण, सावंतवाडी तालुका खजिनदार सिद्धार्थ पराडकर, लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे शंशाक विचारे, कोल्हापूर येथील वैभवलक्ष्मी रक्तपेढीचे संचालक धनजंय साळोखे आदी उपस्थित होते.

यावेळी प्रमुखवक्ते म्हणून बोलताना सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांनी थॅलिसेमिया आजाराविषयी सविस्तर माहिती देतानाच ज्याच्या कुटुंबात थॅलिसेमियाग्रस्त बाळ जन्माला आलेले आहे त्या कुंटुबाचे दु:ख न संपणारे आहे पण यापुढे तो आजार होऊच नये म्हणून आपण प्रयत्न करु शकतो त्याविषयीचे निकष त्यांनी स्पष्ट केले तसेच जिल्ह्यातील १४ थॅलिसेमियाग्रस्त मुलांचे रक्ताच्या पुर्ततेचे पालकत्व सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानने कायमस्वरुपी घेतल्याचे सांगितले.

प्रकाश तेंडोलकर यानी संस्थेच्या रक्तदान देहदान अवयवदान रुग्णमित्र आणि मित्रसंस्था या पंचसुत्रीविषयी सविस्तर माहिती दिली. वैभवलक्ष्मी रक्तपेढीचे संचालक धनजंय साळोखे यांनी श्री म्हाळाईदेवी कला क्रिडा मित्रमंडळाने रक्तसंकलनासाठी आम्हाला निमंत्रित केल्याबद्दल मंडळा प्रती कृतज्ञता व्यक्त केली व कोल्हापूरात किंवा जवळपास इतरत्र कोठेही रक्ताची गरज लागली तर आम्हाला हाक मारा, आम्ही सदैव आपणास सहकार्य करण्यासाठी तत्पर राहू, असे अभिवचन दिले.
या रक्तदान शिबिरामध्ये एकूण चौसष्ट जणांनी रक्तदान केले. त्यामध्ये युवक तसेच महिला रक्तदात्यांचाही उत्फुर्त सहभाग होता. वैभवलक्ष्मी रक्तपेढी वेळेत पोहचण्यासाठी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे सावंतवाडी तालुका सचिव बाबली गवंडे यांनी प्रयत्न केले. यावेळी आरोग्य सेविका संगिता नाईक, आरोग्य सेवक सागर केरकर, तसेच मंडळाचे विकास गावडे, राकेश हरमलकर, प्रितम मालवणकर, महेश लोके, आणि इतर कार्यकर्ते व ग्रामस्थ तसेच महिला वर्गही उपस्थित होत्या.