सातार्डा पोलीस चेक पोस्ट म्हणजे ‘आओ जाओ घर तुम्हारा’

सावंतवाडी : मळेवाड कोंडुरे साटेली सातार्डा मार्गे गोवा या मार्गावर सावंतवाडी पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात येणारी सातार्डा चेक पोस्टची सद्यस्थितीत आओ जाओ घर तुम्हारा अशी झाली आहे. आठ ते दहा दिवसांपूर्वी एक चोरटा सोन्याचे दागिने चोरून वेंगुर्ला येथून नंबर प्लेट नसलेली स्विफ्ट गाडी घेऊन गोव्याच्या दिशेने पसार झाल्याची घटना घडली होती. सदरचा चोरटा पलायन करत असताना काही सतर्क ग्रामस्थांनी सातार्डा पोलीस चेक पोस्टवर फोन करून गाडी येत असल्याची कल्पना पोलिसांना दिली होती.

त्यावेळी पोलिसांनी गाडी अडवण्यासाठी लाठी मोडलेली असल्याने पोलिसांनी हात दाखवून गाडीला थांबवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पुन्हा पोलिसांची संपर्क साधून गाडी पकडली का अशी विचारणा केली असता लाठी मोडलेली असल्याने गाडी थांबवणे शक्य झाले नसून गाडी गोवा राज्यात गेली असे उत्तर देण्यात आले. यासंदर्भात पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांना या घटनेबाबत माहिती देण्यात आली. त्यावेळी आपण तात्काळ त्यांना लाठी दुरुस्त करून घेणे संदर्भात सूचना केल्याचे सांगितले. मात्र या घटनेला आता आठ ते दहा दिवस उलटून गेले तरी लाठी रस्त्याच्या बाजूला दुरुस्त न करता टाकून ठेवलेली दिसून आली आहे. लाठी मोडलेली असल्याने दागिने घेऊन गाडीने पसार होणारा चोरटा पकडता न आल्याची घटना घडल्याने पोलीस सतर्क होऊन लाठी दुरुस्ती बाबत पोलीस गांभीर्याने घेतील असे वाटले होते.

मात्र, पोलीस निरीक्षक मेंगडे यांनी सांगूनही अद्याप पर्यंत आठ ते दहा दिवस उलटू गेले तरी लाठी दुरुस्त न केल्यामुळे सातार्डा पोलीस चेक पोस्ट वरील पोलीस कर्मचारी आपल्या वरिष्ठांच्या आदेशाला जुमानत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र व गोवा हद्दीवरील ही सर्वात महत्त्वपूर्ण चेक पोस्ट असून या मार्गावरून मोठ्या प्रमाणात अवैध दारूची वाहतूक होते अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. यां दारू वाहतुकीला पोलिसांचा वरदहस्त असल्याने लाठी दुरुस्त केली जात नाही की काय? असा  संशय व्यक्त केला जात आहे. एकंदरीतच सातार्डा पोलीस चेक पोस्टची स्थिती आओ जावो घर तुम्हारा अशी झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. यामुळे या प्रकाराकडे पोलीस अधीक्षक लक्ष देतील का अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.