सिंधुदुर्ग टीचर फोरमची नवीन कार्यकारिणी जाहीर…!

सावंतवाडी : एस. आर. दळवी फाऊंडेशन मुंबईच्या सिंधुदुर्ग टीचर फोरमची चालू वर्षासाठी नवीन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. शिक्षक सक्षमीकरणासाठी कार्यरत असणार्‍या या फाऊंडेशनची स्थापना विलवडे गावचे सुपुत्र रामचंद्र दळवी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सीता दळवी यांनी केली आहे. सध्याचे जिल्हाध्यक्ष महेश लाडू सावंत यांची निवड राज्य कार्यकारणीवर झाली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची जबाबदारी जिल्हाध्यक्ष म्हणून सचिन मदने ( कुडाळ) यांच्याकडे सोपवण्यात आली तर सचिव पदी विजय गावडे (सावंतवाडी) यांची निवड झाली आहे.

नवीन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी चेतन बोडेकर (वैभववाडी) आणि ज्योती बुवा ( मालवण) यांची वर्णी लागली आहे. तर सहसचिव पदी अमर वाघमारे (मालवण ) यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. फाऊंडेशनच्या प्रमुख सल्लागार म्हणून प्रा. रुपेश पाटील (सावंतवाडी), किशोर सोनसूरकर ( वेंगुर्ला) आणि सदाशिव राणे ( कणकवली) यांना स्थान देण्यात आले आहे.

फाऊंडेशनचे मावळते जिल्हाध्यक्ष महेश सावंत यांनी ही निवड जाहीर केली आहे. तसेच सर्व तालुका कार्यकारिणीही लवकरच जाहीर होईल, असे त्यांनी सांगितले. पुढील वर्षभरात विविध कार्यक्रम शिक्षक तसेच विद्यार्थी यांच्यासाठी राबविले जाणार आहेत. शिक्षकांसाठी ऑनलाईन वेबिनार, विविध स्पर्धा आयोजित केले जातील. यात जास्तीत जास्त शिक्षकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.