मुंबई : पिस्तूलचा धाक दाखवून नोकराचे दोन्ही हात, पाय बांधून कपाटातील रोकड आणि सोन्याचे दागिने असा मिळून सुमारे ४० लाख रुपयांचा ऐवज लुटून पळून गेलेल्या मुख्य आरोपीसह तिघांना ४८ तासांमध्ये अटक करण्यात बांगुरनगर पोलिसांना यश आले. देवेश प्रेमचंद सवासिया, मुस्तकीन ऊर्फ सोहेल रहिम शेख आणि सर्वेश कल्लू शर्मा अशी अटक आरोपींची नावे असून सर्वेश हा कंत्राटदार आहे. त्यानेच या कटाची योजना बनविल्याचे तपासात उघड झाले. या आरोपींनी लुटलेली रोकड आणि दागिने पोलिसांनी हस्तगत केले. सध्या तिन्ही आरोपी पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. गोरेगाव येथील ओशिवरा बस डेपोजवळील धीरज अपार्टमेंटमध्ये रविवारी सकाळी ११.३० ते दुपारी १.३० च्या सुमारास ही घटना घडली.





