कणकवली: कणकवली रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ लगत आज दुपारी मोठी आग लागली. यावेळी रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या कोच्चिवली-श्रीगंगानगर या एक्सप्रेसमधील प्रवाशांना धुराचा त्रास सहन करावा लागला . एका तासाच्या प्रयत्नानंतर रेल्वे पोलीस, रेल्वे कर्मचारी तसेच काही स्थानिक ग्रामस्थांनी आग नियंत्रणात आली. दुपारी दोनच्या सुमारास आग लागली तर सायंकाळी चार पर्यंत आगीच्या धुराचे लोट कायम होते.
कणकवली रेल्वेस्टेशनच्या प्लॅटफॉर्म दोनच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गवत सुकले आहे. दुपारी दोनच्या सुमारास या गवताने पेट घेतला आणि आग पसरली . यावेळी जोरात वारा असल्याने काही मिनिटांत आग भडकली. त्याचवेळी रेल्वे स्थानकात कोच्चिवली श्रीगंगानगर एक्सप्रेस दाखल झाली. या गाडीतील प्रवाशांना मोठ्या प्रमाणात धुरांच्या लोटांचा सामना करावा लागला. त्यामुळे ही गाडी पुढे नेऊन थांबविण्यात आली. रेल्वे कर्मचारी, रेल्वे पोलीस आणि स्थानिकांनी सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. तरीही सायंकाळी पाच वाजेपर्यंत धुराचे लोट होते. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही . मात्र स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात उगवलेले गवत काढण्यात यावे अशी मागणी रेल्वे प्रवाशांकडून होत आहे.





