वैभववाडीत प्राथमिक शिक्षकाची आत्महत्या : शिक्षण विभागात एकच खळबळ.!

132

वैभववाडी : लोरे हेळेवाडी येथील प्राथमिक शिक्षक राजा बिरू गाडीकर वय ४३ यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वैभववाडी फणसाचा माळ येथे ही घटना घडली. त्यांच्या आत्महत्येचे कारण नेमके समजू शकले नाही. याबाबत पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षकाच्या आत्महत्याने शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे. राजा गाडीकर हे मूळचे चांदोरी तालुका निलगा जिल्हा लातूर येथील होते. गेले अनेक वर्ष ते वैभववाडी तालुक्यात ज्ञानदानाचे काम करत होते. यापूर्वी त्यांनी विद्यामंदिर अरुळे, कुर्ली केंद्र शाळा येथे सेवा बजावली होती.

सध्या ते लोरे हेळेवाडी येथील शाळेवर कार्यरत होते. गुरुवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्यांनी पत्नी संगीता हिला मला कंटाळा आलाय मी जरा बाहेर जाऊन येतो असे सांगून ते घराबाहेर पडले होते. त्यानंतर सायंकाळी 4:20 वा. सुमारस पत्नीला त्यांनी फोन करून आपण ज्या ठिकाणी फिरायला जातो तिथे तू सायंकाळी वाजण्याच्या सुमारास पाणी घेऊन ये असे सांगितले. त्याप्रमाणे पत्नी सायंकाळी सहा वा.च्या सुमारास फणसाचा माळ येथे पाणी घेऊन गेली होती. यावेळी गाडीकर यांनी झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले. पत्नी संगिता गाडीकर यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.