सिंधुदुर्गनगरी; नुकतीच शासकीय रुग्णालयातील रक्त दरवाढ जाहीर झाली आहे . रक्त पिशवीचा दर 450 वरून थेट 1150 रुपयांवर गेला आहे .या दरवाढी विरोधात युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्गनगरी येथे मोर्चा आणि घंटानाद आंदोलन युवासेनेने केले .आमदार वैभव नाईक , शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश सावंत, संजय पडते, संदेश पारकर, महिला जिल्हा संघटक जान्हवी सावंत, नीलम सावंत यांच्या उपस्थितीत युवासैनिकांनी ओरोसला घंटानाद केला. .यावेळी बाजार मांडला रक्ताचा , जीव जातो लोकांचा , रक्तपिपासू सरकारचे करायचे काय ? खाली डोके वर पाय आदी आदी घोषणा घंटानाद करत दिल्या. मोठ्या संख्येने उपस्थित शिवसैनिकांचा मोर्चा रक्त पिशव्यांचे दर कमी करा अशी मागणी करत जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयावर धडकला. रक्त पिशवी शुल्क कमी करण्याचे निवेदन जिल्हा शल्य चिकित्सक यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा रुग्णालयात रक्तदान करत शिवसैनिकांनी रक्त दरवाढीचा अनोखा निषेध देखील केला.





