कणकवली : राम जन्मला ग सखे ….राम जन्मला..! अशा जयघोषात श्री राम सेवा ट्रस्ट नांदगाव गोसावी कुंभारवाडी येथे राम जन्मोत्सव सोहळा पार पडला. हा सोहळा भावी भक्तांनी याची देही याची डोळा पाहिल्याने त्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. सकाळी सत्यनारायण महापूजा संपन्न झाली. त्यानंतर दुपारी संतांचे कीर्तन व १२ वाजता राम जन्मोत्सव सोहळा पार पडला.

रामनवमीनिमित्त श्री राम सेवा ट्रस्ट नांदगाव गोसावी कुंभारवाडी मंदिरात राम जन्मोत्सव उत्साहात पार पडला. मंदिरातील रामप्रभूंच्या मूर्तीच्या ठीकाणी फुलांची आरास करण्यात आली होती. मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सकाळापासून मंदिरात दर्शनासाठी भाविक भक्तांची रीघ लागली होती. त्यानंतर दुपारी १२ वा. राम जन्मोत्सव पार पडला. यावेळी कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या, राम जन्मला गं सखे राम जन्मला अशी पाळणे गिते व भक्तीगीते म्हटली.

यावेळी श्रीराम सेवा ट्रस्ट नांदगाव गोसावी कुंभारवाडी अध्यक्ष गणेश बांदिवडेकर, उपाध्यक्ष समीर कुंभार, सचिव प्रवीण बांदिवडेकर, खजिनदार श्रीकांत नार्वेकर, सरपंच रविराज (भाई) मोरजकर, सदस्य सुरेश कुंभार, शांताराम गोसावी, शांताराम बांदिवडेकर, सुनील नार्वेकर, राजेश देसाई आणि समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.





