पत्रकारांवर होणारे हल्ले योग्य नाही ; पत्रकारांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवले पाहिजे : नायब तहसिलदार संदिप पानमंद

68

वेंगुर्ले : दिवसेंदिवस पत्रकारिता बदलत आहे. पत्रकार सत्य वृत्त शोधण्यासाठी प्रयत्न करीत असतात. मात्र सत्य दडपण्यासाठी आज पत्रकारांवर काही ठिकाणी हल्ले होण्याचे प्रकार घडत आहेत. हे योग्य नसून पत्रकारांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवले पाहिजे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे उद्घाटक वेंगुर्ले चे निवडणूक नायब तहसिलदार संदिप पानमंद यांनी केले.
वेंगुर्ला तालुका पत्रकार संघाचा तालुकास्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा आज सोमवारी पाटकर हायस्कूलच्या ज्युब्ली हॉलमध्ये संपन्न झाला. यावेळी व्यासपिठावर गटविकास अधिकारी मोहन भोई, प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ.राजन खांडेकर, जिल्हा दुग्ध उत्पादक संघाचे अध्यक्ष एम.के.गावडे, फुले, शाहू, आंबेडकर विचार मंच वेंगुर्लाचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर, काथ्या कारखान्याच्या व्यवस्थापकिय संचालिका प्रज्ञा परब, रा.कृ.पाटकर हायस्कूलचे मुख्याध्यापक दादा सोकटे, जिल्हा युथ असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास गावडे, शिवसेनेचे वेंगुर्ला तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, शहरप्रमुख उमेश येरम, राष्ट्रवादीचे वेंगुर्ला शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदिप सावंत आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात संजय मालवणकर कुटुंबियांकडून पुरस्कृत करण्यात आलेला कै. संजय मालवणकर स्मृती पुरस्कार दै.लोकमत व सा. किरातचे प्रतिनिधी प्रथमेश गुरव यांना गटविकास अधिकारी मोहन भोई यांच्या हस्ते, अरुण काणेकर कुटुंबियांकडून पुरस्कृत करण्यात आलेला कै. अरुण काणेकर स्मृती पुरस्कार सा.कोकण प्रभातचे संपादक योगेश तांडेल यांना निवडणूक नायब तहसिलदार संदिप पानमंद यांच्या हस्ते, पी.ए.केसरकर कुटुंबियांकडून पुरस्कृत करण्यात आलेला कै. पांडुरंग अनंत तथा शशिकांत केसरकर स्मृती पुरस्कार दै. पुढारीचे प्रतिनिधी अजय गडेकर यांना प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. राजन खांडेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरुप होते. दरम्यान, जिल्हा पत्रकार संघाचा ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार प्राप्त दै. पुढारीचे आरवली प्रतिनिधी एस.एस.धुरी यांचा जयप्रकाश चमणकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पुरस्कार प्राप्त पत्रकारांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी बोलताना डॉ.राजन खांडेकर म्हणाले की, पत्रकारीतेत आज फार मोठे बदल झाले आहेत. सर्वांवर अंकुश ठेवण्यासाठी पत्रकारांमध्ये निःपक्षपातीपणा, शोध घेण्याची वृत्ती, वेळेचे भान, संयम, संभाषण कौशल्य व समयसुचकता हे गुण आवश्यक आहेत. तर गटविकास अधिकारी मोहन भोई यांनी या चांगल्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाल्याबद्दल आभार मानून पत्रकार संघाच्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. यावेळी अन्य मान्यवरांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष प्रदिप सावंत यांनी, सूत्रसंचालन महेंद्र मातोंडकर तर आभार सचिव अजित राऊळ यांनी मानले. कार्यक्रमाला पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष दाजी नाईक, जिल्हा सदस्य दीपेश परब पत्रकार के.जी.गावडे, मॅक्सी कार्डोज, विनायक वारंग, सुरज परब, संदेश राऊळ, सीमा मराठे, भरत सातोस्कर आदी उपस्थित होते.