सावंतवाडी :सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. देश विदेशातून या ठिकाणी पर्यटक येत असतात. अशा कुटुंबवत्सल पर्यटकांना पोलीस यंत्रणेकडून नाहक त्रास दिल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येईल. पर्यटकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची खबरदारी घेऊन तसे धोरण आखले जाईल. यात कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा कोकण विभाग परीक्षेत्र पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार यांनी दिला. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके उपस्थित होत्या.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकणपट्ट्यातील पाच जिल्ह्यांपैकी गंभीर गुन्ह्यांचं प्रमाण सर्वात कमी आहे. याचं श्रेय येथील लोकांना जातं. हा जिल्हा केवळ निसर्ग संपन्न नाहीतर येथील लोकही शांतता प्रिय आहेत. पोलिसांनाही येथील लोकांचं नेहमीच सहकार्य लाभतं, असंही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं.
ऑनलाइन आर्थिक फसवणूकीचे प्रकार सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात वाढीला लागलेले असल्यामुळे त्यावर आळा घालण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष सायबर पोलीस स्टेशन सुरू करण्यात येत आहे. या ठिकाणी तज्ञ पोलिस अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे. त्याद्वारे या गुन्हेगारीचे प्रमाणही कमी करण्यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत. सद्यस्थितीतही जिल्ह्यातील सायबर क्राईम ब्रांच चांगलं काम करीत असून अशा गुन्हेगारीला आळा बसविण्यासाठी आमचे अधिकारी जास्तीत जास्त प्रयत्न करीत आहेत. त्याचबरोबर महाविद्यालय तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी अवेअरनेस प्रोग्राम सुरु करण्यात आले असून नागरिकांनी याबाबत सतर्क राहून खबरदारी घेण्यासाठी जनतेमध्ये जागरूकता आणण्यासाठीही आमचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आंबोली घाटात पर जिल्ह्यातून मृतदेह आणून टाकण्याचे प्रकार घडताना दिसतात. विशेषतः कोल्हापूर व सातारा भागातून अशा प्रकारचे मृतदेह टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांना याबाबत सूचना करण्यात आल्या असून त्यांच्या जिल्ह्यातील नापताच्या तक्रारी तपासून सिंधुदुर्ग जिल्ह्याची संपर्क ठेवण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत. अलीकडे हे प्रमाण फारच कमी झाले असून पर्यटन हंगाम व इतर गर्दीच्या वेळी विशेष पोलीस कुमक देऊन गुन्हेगारीच्या प्रमाणाला आळा घालण्यासाठीही आमचे प्रयत्न राहतील, असेही ते म्हणाले.
गोवा राज्यातून सिंधुदुर्ग मार्गे अन्य जिल्ह्यात होणारी अवैध दारू वाहतूक रोखण्याकरिता पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून या प्रकारावर जास्तीत जास्त निर्बंध येण्यासाठी पुढील काळात उपाययोजना केल्या जातील. त्याचप्रमाणे चारचाकी गाड्यांना लावण्यात येणाऱ्या काळ्या काचा व अवैध नंबर प्लेट बाबत कडक कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. अवैध दारू व्यवसायिकांकडून सुरू असलेली मुजोरी व पोलीस कर्मचाऱ्यांना दिली जाईल जाणारी वागणूक याबाबतही माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
सोनुर्ली येथील मंदिरात झालेल्या चोरीच्या प्रकारानंतर सीसीटीव्ही फुटेज मध्ये चोरटे दिसून आले असतानाही त्यांना पकडण्यात पोलिसांना आलेल्या अपयश तसेच अलीकडे मंदिरांमध्ये घंटा पितळेच्या मुर्त्या व फंड पेट्या फोडण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत याबाबत विचारले असता या प्रकारांमध्ये आजूबाजूच्या जिल्ह्यातील चोरट्यांचा समावेश असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत तपास सुरू असून लगतच्या जिल्ह्यामधील चोरट्यांची माहिती आदान प्रदान करून अशा चोरट्यावर कारवाई करण्यासाठी ही प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
जिल्ह्यातील पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासासाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू असून लवकरच याबाबत कार्यवाही केली जाईल. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची असलेली कमतरता याबाबतही पाठपुरावा सुरू असून काही कर्मचारी जिल्ह्यात रुजू झाल्यानंतर त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना आंतरजिल्हा बदली द्यावी लागते. त्यामुळे पुन्हा कर्मचाऱ्यांची वानवा जाणवते याबाबतही उपाययोजना केल्या जातील असेही त्यांनी स्पष्ट केले.





