डॉ. गायतोंडे यांच्या पुतळ्याचे बांदा येथे अनावरण

58

बांदा : जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार, बांदा गावचे सुपुत्र, गोगटे वाळके महाविद्यालय आणि बी. एस. बांदेकर फाईन आर्ट्स महाविद्यालयाचे संस्थापक (कै.) डॉ. बी. बी. गायतोंडे यांचा द्वितीय स्मृतिदिन सोमवारी (ता. २७) साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त त्यांच्या पुतळ्याचे अनावरण गोगटे वाळके महाविद्यालयाच्या मुख्य आवारात करण्यात येणार आहे.

डॉ. गायतोंडे यांनी परिश्रमपूर्वक आपले शालेय आणि उच्च शिक्षण अतिशय गुणवत्तापूर्ण श्रेणीत प्राप्त करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला. हाफकिन इन्स्टिट्यूट, बॉम्बे हॉस्पिटल, इंडियन मेडिकल कौन्सिल आदी भारतीय आणि जागतिक स्तरावरील वैद्यकीय क्षेत्रातील अनेक संस्थांमध्ये त्यांनी सन्मानाची पदे त्यांनी भूषविली. त्यांच्या या कार्याचा यथोचित गौरव म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने त्यांची आशिया खंडाचे प्रतिनिधी म्हणून नियुक्ती “केली होती. ते कार्य पूर्ण झाल्यानंतर त्यांनी बांदा या आपल्या मूळ गावी राहून शैक्षणिक आणि सामाजिक कार्य सुरू केले. गोगटे वाळके महाविद्यालयाची स्थापना करून दोडामार्ग आणि बांदा परिसरातील ७० खेड्यांतील विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची सोय केली. कोकणासाठी फाईन आर्ट्स कॉलेज निर्माण करण्याच्या इच्छेतून बी. बी. गायतोंडे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सावंतवाडी येथे बी. एस. बांदेकर फाईन आर्ट्स महाविद्यालयाची स्थापना केली. दरम्यान, कार्यक्रम सकाळी अकराला होणार आहे. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डी. बी. वारंग आणि प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर यांनी ही माहिती दिली.