….यासाठी मडुरा दशक्रोशीतील ग्रामस्थांनी कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांना घेराव घालत जाब विचारला.!

86

बांदा : तिलारी कालव्याचे पाणी अद्याप रोणापाल पर्यंत न आल्याने मडुरा दशक्रोशीतील ग्रामस्थांनी कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांना घेराव घालत जाब विचारला. तिलारी विभागाच्या कार्यपद्धतीचे यावेळी वाभाडे काढण्यात आले. ३१ मार्चपर्यंत कालव्याला पाणी न आल्यास १ एप्रिल रोजी चराठे कार्यालयात गळफास घेऊ असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला. दरम्यान, कालव्यात पाणी येण्यासाठीचे सर्व अडथळे दूर करण्यात आल्याचे यावेळी रोहित कोरे यांनी स्पष्ट केले.

तब्बल तीन तप लोटले तरीही तिलारी कालव्याचे पाणी अद्यापपर्यंत रोणापाल पर्यंत आलेले नाही. गेली तीन वर्षे संबंधित विभागाकडून ग्रामस्थांची दिशाभूल करण्यात येत आहे. दोन महिन्यांपूर्वी अभियंता कोरे यांनी मार्च अखेरपर्यंत निश्चितपणे पाणी रोणापाल गावापर्यंत येईल असे लेखी दिले होते. मात्र, त्यासाठी ठोस कार्यवाही होत नसल्यामुळे ग्रामस्थ व शेतकर्‍यांनी सोमवारी चराठे येथील कार्यालयावर धडक मोर्चाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधले.

जलसंपदा विभागाचे अधिकारी, अभियंता व ठेकेदार मालामाल होण्यासाठी  तिलारीची कामे सुरु आहेत. शेतकर्‍यांपर्यंत पाणी पोचविण्याचे सोयरसुतक विभागाला नसल्याचा आरोप प्रकाश वालावलकर व सुरेश गावडे यांनी केला. तिलारीच्या कामांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. कालव्यात पाण्याचा पत्ता नसतानाही उपकालवे, पाईपलाईनची कामे करण्यात स्वारस्य दाखविण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला.

यावेळी शिष्टमंडळाच्या प्रश्नांना उत्तरे देताना अभियंता कोरे यांची भंबेरी उडताना दिसत होती. ३१ मार्चपर्यंत निश्चितपणे रोणापाल पर्यंत पाणी येईल असे सांगताच ग्रामस्थ आक्रमक झालेत. गेली दोन वर्षे कालव्यातून पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन देऊनही कार्यवाही झाली नसल्याकडे लक्ष वेधण्यात आले. शेतकरी ग्रामस्थ आता आरपारची लढाई करण्याच्या बेतात आहेत. ३१ मार्चपर्यंत कालव्यात पाणी न आल्यास १ एप्रिल रोजी चराठे कार्यालयात गळफास घेत आत्महत्या करणार असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला.

यावेळी रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे, उदय देऊलकर, निगुडे माजी सरपंच जयराम गवंडे, शामराव म्हाडगुत, मडुरा उपसरपंच बाळू गावडे, माजी ग्रा. पं. सदस्य प्रकाश वालावलकर, मडुरा सोसायटी माजी चेअरमन ज्ञानेश परब, वाफोलीचे सामाजिक कार्यकर्ते संजय आईर, विलास पावसकर, अरुण पंडीत, श्रीमती खानोलकर उपस्थित होते.