संतापलेल्या स्टॉल धारकांमधून संतापजनक प्रतिक्रिया.!
कणकवली I मयुर ठाकूर : मुंबई – गोवा महामार्गचे काम सुरू झाल्यावर कणकवली शहरात अगदी नरडवे फाटा ते हॉटेल मंजुनाथ पर्यंत चा भाग हा मधल्या पॅसेजढे स्टॉल धारकांनी तर सर्व्हिस रस्त्याची एक बाजू वाहन पार्किंग ने भरगच्च झालेली दिसून यायची. असे असताना शहरातील भाजी विक्रेत्यांना का बरं उड्डाणपुलाखाली बसवलं गेलं होतं ? कणकवली शहराला भाजी मार्केट नाहींय का ? कणकवली शहराचा इतर गोष्टींमध्ये विकास होऊ शकतो मग अशा सामाजिक व कौटुंबिक गोष्टींमध्ये मागे का ? तेव्हा आश्वासन देणारे लोकप्रतिनिधी, सत्ताधारी, संबंधित अधिकारी गेले कुठे ? आश्वासन देण्यासाठी येणारे राज्यकर्ते जेव्हा कारवाई झाली तेव्हा कुठे होते ? त्यांनी आम्हाला वाऱ्यावर सोडले असे म्हणणे वावगे ठरणार तर नाही ना ? असे प्रश्न उड्डाणपुलाखालील स्टॉल धारकांनी उपस्थित केले. तर काही महिला स्टॉल धारकांनी तर अगदी प्राधिकरण व पोलीस प्रशासन व यंत्रणेच्या लोकांसमोर हात जोडले.
जर या स्टॉल धारकांवर उपासमारीची वेळ आली तर या लोकांनी करावे काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. महामार्गखालील ओव्हरब्रिज ने मोकळा श्वास घेतला मात्र त्या सर्वसामान्य स्टॉल धारकांना मोकळा श्वास केव्हा घेणे शक्य होईल हे देखील प्रशासन यंत्रणेने सांगणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास आम्हाला या गोष्टीला वेगळं वळण लावणं भाग पडेल असे देखील आक्रमक झालेल्या स्टॉल धारकांनी सांगितलेलं आहे.
कणकवली – देवगड – वैभववाडी मतदार संघातील कणकवली ही सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. या मतदार संघातील वैभववाडी नंतर आता कणकवली शहरातील उड्डाणपुलाखालील स्टॉल धारक हे उध्वस्त झाले आहेत. कणकवली – देवगड – वैभववाडी मतदार संघाचे आमदार नितेश राणे तसेच कणकवली चे नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, सीओ अवधूत तावडे यांच्यासह प्रशासन आणि यंत्रणा स्टॉल धारकांबाबत कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. स्टॉल हटाव मोहीम सुरू झाल्यावर काही स्टॉल धारकांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या ओम गणेश बंगल्यावर भेट घेतली होती. दरम्यान मंत्री राणे यांनी उद्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सीओ यांची तातडीची बैठक घेणार असल्याचे सांगितले. सदर बैठकीत नेमका काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.





