सिंधुदुर्गनगरी : जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी तसेच इतर मागण्यांसाठी आजपासून राज्यभरातले सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत . सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील या संपाचा प्रतिसाद पाहायला मिळत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा परिषद कार्यालयातील बहुतांश कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राज्य सरकारी कर्मचारी , शिक्षक , प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या एकूण 56 संघटनांनी मिळून एक विशाल मोर्चा सिंधुदुर्ग नगरी या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी काढला . येथील रवळनाथ मंदिराकडून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा नेण्यात आला.

सिंधुदुर्ग जिल्हा अधिकारी कार्यालय तसेच जिल्हा परिषद कार्यालय , जिल्हा परिषद शाळा , नगरपरिषद , जिल्हा आरोग्य यंत्रणा कर्मचारी आदी मिळून जिल्ह्यातील दहा हजार पेक्षा जास्त कर्मचारी आज पासून संपावर गेले आहेत . जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या मोर्चाचे रूपांतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या ठिकाणी सभेत झाले .
या सभेमध्ये कर्मचारी संघटनेच्या नेत्यांनी आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना आम्ही धडा शिकवू अशा प्रकारचे आव्हान दिले . जुनी निवृत्ती वेतन योजना तसेच इतर मागण्या जोपर्यंत सरकार मान्य करत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याचा निर्धार यावेळी मोर्चेकर्यांनी व्यक्त केला .





