सतीश सावंत तुम्ही कोण आहात..? काय झालात आणि कोण होतात | अंकुश जाधव एवढे का संतापले..?

357

सावंतवाडी : मिस्टर सतीश सावंत तुम्ही कोण आहात..? काय झालात आणि कोण होतात याचा जरा मागोवा घ्या. तुम्ही म्हणा किंवा आमच्या सारखे कैकजण केवळ आणि केवळ केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब यांच्या आशिर्वादामुळेच नावारूपाला आलेत आणि अनेक पदे भूषविली आहेत. त्यापैकी तुम्हीही एक आहात याचं विस्मरण होऊ देऊ नका अन्यथा रामेश्वर माफ करणार नाही. उरला प्रश्न आमदार नितेश राणे यांचा अभेद्य गड भेदायची जी तुम्ही कोल्हेकुई केली हे संचयन करण्या एवढे सहज सोपे नाही. अगोदर गोटया सावंत रुपी वाघाच्या गडाची एक वीट तरी हलवून दाखवा असे आव्हान माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी शिवसेना कणकवली विधानसभा मतदारसंघ जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांना दिले आहे.

सतीश सावंत यांनी पत्रकार यांचेशी बोलताना कणकवली देवगड वैभववाडी चे आमदार नितेश राणे यांच्यावर टीका करत त्यांचा गड भेदाण्याचे आव्हान दिले. याला माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव पत्रकातून उत्तर देत जोरदार प्रत्युत्तर दिले. जाधव म्हणाले की, सतीश सावंत यांनी आपला राजकीय प्रवासाचा मागोवा घ्यावा. जी पदे मिळाली ती केवळ राणे यांच्या मुळे मिळाली हे विसरता येण्याजोगे नाही.

तुम्हीच नाही तर आमच्या सारख्या अनेकजणांना पदे भूषविण्याची संधी राणे यांच्या मुळेच मिळाली हे सर्वसामान्य जनतेलाही अवगत आहे.त्यामुळे सावंत जनता असचं म्हणेल कोण होतास तू कोण झालास तू. यांचे आत्मभान ठेवून राणे परिवार टीका करा. तुम्हाला जिल्हाप्रमुख पद देऊन रिचार्ज केल याबद्दल तुमचे अभिनंदन. परंतु राजकीय राक्षशी महत्वकांक्षेपोटी राणे परिवारावर टीका करत असाल तर त्याला आम्ही उत्तर देणारच. तुम्ही काय म्हणालात आमदार नितेश राणे मतदार संघात विकास कामे करत नाहीत. फक्त स्टंट बाजी करतात. अहो महाशय पाच वर्षे विरोधी आमदार त्याच्या नंतर परत अडीज वर्षे विरोधी आमदार. ते आता या सहा महिन्यात सत्तेततील आमदार आहेत. त्यांनी सत्तेत नसतानाही आणि आता सत्तेत असताना त्याच ताकतीने मतदारसंघात विकास कामे केली आहेत. ती विकास कामे सतीश सावंत तुम्ही गांधारी सारखी डोळ्यावर पट्टी बांधल्याने कधीच दिसणार नाहीत. कधीतरी चांगल्याला चांगल म्हणा राव,बरकतीला आणि आरोग्यालाही चांगल ते! तुम्ही काय कोल्हेकुई केली तर आमदार नितेश राणे यांचा गड भेदणार.

अहो सावंत हे संचयन करण्या एवढे सोपे आहे का? याची जाणीव तुम्हालाही आहे उगाचच बोलायचे म्हणून नका बोलू नाहीतर तोंडघशी पडत राहणार. स्वाभिमान पक्षात तुम्ही ही सोबत होताच की. यावर तुम्ही वक्तव्य करणं, मी नाही त्यातली आणि कढी लावा आतली “” या म्हणी सारखंच आहे. आमदार नितेश राणे यांना आव्हान देण्याअगोदर गोटया सावन्त यांच्या गडाची एक तरी वीट हलवून दाखवा. गोटया सावन्त आणि त्यांच्या पत्नी सौं संजना सावंत यांनी तुम्हाला प्रत्येक वेळी चिटपट केल आहे. हे जिल्हावासियांना माहित आहे. उगाच उंदीराने राजवस्त्र परिधान करून राजा व्हायला जायचं नाही. नाहीतर त्याचा जोकर होतो. यांचे आत्मभान ठेवा आणि गड भेदायची भाषा करा. तुम्हाला आता पर्यंत जे मिळालं ते केवळ राणे यांच्यामुळेच मिळाले आहे याची जनाची नाही निदान मनाची ठेवा असे सडेतोड उत्तर माजी समाजकल्याण सभापती जाधव यांनी सतीश सावंत यांना दिले.