मुंबई : सर्दी-ताप किंवा खोकला अशा आजारांसाठी अँटिबायोटिक औषधं घेतली जातात. कित्येक वेळा रुग्ण स्वतःच डॉक्टरांचा सल्ला न घेता अँटिबायोटिक औषधं खातात.मात्र, गरज नसताना वारंवार अँटिबायोटिक घेतल्यामुळे त्यांचा परिणाम कमी होतो. नंतर एखाद्या गंभीर आजारावेळी जेव्हा खरोखरच अँटिबायोटिक्सची गरज असते, तेव्हा ती औषधं परिणाम करत नाहीत. भारतात अशीच परिस्थिती असल्याचं काही महिन्यांपूर्वी लॅन्सेटच्या एका अभ्यासात समोर आलं होतं. भारतात अँटिबायोटिक्सच्या वापरावर कसलंही नियंत्रण नसल्याची बाब या संशोधनात निदर्शनास आलं होतं.
त्यानंतर आता इंडियन मेडिकल असोसिएशननं (आयएमए) एक निवेदन जारी केले आहे. ज्यामध्ये योग्य निदान केल्याशिवाय अँटिबायोटिक्स न घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हंगामी सर्दी आणि खोकल्यादरम्यान ज्यांना मळमळ, उलट्या, ताप आणि शरीरदुखी यांसारखी लक्षणं जाणवत आहेत त्यांनी अँटिबायोटिक्स न घेण्याचा सल्ला इंडियन मेडिकल असोसिएशननं दिला आहे.
नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलचा (एनसीडीसी) हवाला देऊन, आयएमनं म्हटलं आहे की, तीन आठवड्यांपर्यंत येणारा सतत खोकला आणि तीन दिवसांनंतर निघून जाणारा ताप हा एच3एन2 एन्फ्लुएंझा विषाणूच्या संसर्गाचा प्रकार असतो. त्यामुळे योग्य निदान झाल्याशिवाय औषधोपचार घेऊ नयेत. डॉक्टरांनी रुग्णांना अँटिबायोटिक्स लिहून देण्यापूर्वी संसर्ग जीवाणूजन्य आहे की नाही, याचं निदान करण्याची शिफारस वैद्यकीय संस्थेनं केली आहे.
शिवाय पुढे असं सुचवलं आहे की, सर्दी आणि खोकल्यासाठी वैद्यकीय थेरेपी किंवा लक्षणांवर परिणाम करणारी औषधं घेतली पाहिजेत. आयएमएनं आपल्या निवेदनात म्हटले आहे, “सध्या नागरिक अॅझिथ्रोमायसिन आणि अमोक्सिक्लॅव्ह इत्यादी अँटिबायोटिक्स घेत आहेत. वारंवारतेची पर्वा न करता ही औषधं घेतली जातात आणि बरं वाटू लागल्यावर ती थांबवली जातात. हा प्रकार थांबवणं गरजेचं आहे, कारण यामुळे अँटिबायोटिक रेझिस्टंट होतो.
म्हणजेच जेव्हा अँटिबायोटिक्सची खरचं गरज असते तेव्हा ती प्रभावी ठरत नाहीत.” त्यात पुढे नमूद करण्यात आलं आहे की, संबंधित लक्षणं नसतानाही अनेक डॉक्टरांनी अँटिबायोटिक औषधं लिहून दिलेली आहेत. सुमारे ७० टक्के डायरियाची प्रकरणं विषाणूजन्य असतात. अशा परिस्थितींमध्येही बहुतेक डॉक्टर अँटिबायोटिक्स लिहून देतात. “अमोक्सिसिलिन, नॉरफ्लॉक्सासिन, सिप्रोफ्लोक्सासिन, ऑफलोक्सासिन आणि लेव्होफ्लोक्सासिन या अँटिबायोटिक्सचा सर्वात जास्त गैरवापर होत आहे. डायरिया आणि यूटीआयसाठी (मूत्रमार्गाच्या संसर्गासाठी) त्यांचा वापर होत आहे,” असंही आयएमएच्या निवेदनात नमूद केले आहे.




