टायर फुटल्याने समृध्दी महामार्गावर कार उलटून १ ठार २ जण गंभीर…!

जालना : पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर कारला अपघात झाला . टायर फुटल्याने भरधाव कार पलटी होऊन हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारमधील एकजण जागीच ठार झाला तर उर्वरित ६ पैकी दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.अमरसिंग शौकिलाल सिंग असे या अपघातातील मृताचे नाव आहे.

स्कार्पिओ कार क्र.युपी.91 एन. 7517 पुण्यावरून समृद्धी महामार्गावरून नागपूरकडे जात असताना चॅनल क्रमांक 380 जवळ कारचे मागचा टायर अचानक फुटले. कारचे टायर फुटल्यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि वेगात असलेली कार दोन्ही लेनच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकामध्ये जाऊन उलटली.या भयानक अपघातात कारमधील अमरसिंग शौकिलाल सिंग रा.बांदा,उत्तरप्रदेश यास गंभीर इजा झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर बांदा,उत्तरप्रदेश येथील रहिवासी असलेले बिरुसिंग,संजयसिंग शंकरसिंग,राजेशसिंग, भोलासिंग,सर्वेश कुमार राहुरी,दिलीपकुमार रामस्वरुप हे जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांपैकी दोघांची स्थिती गंभीर असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अभय दंडगव्हाळ, कर्मचारी कोकणे हे घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी पंचनामा करून जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविले.

गेल्या आठवड्यापासून उन्हाचे प्रखर चटके जाणवू लागले आहेत. पारा चढू लागल्याने महामार्गावर गाड्या चालवताना टायर मधील हवेचा दाब वारंवार तपासणे गरजेचे आहे . गाड्यांची गती व तापमान यामुळे गाडीच्या टायर मधील हवेचा दाब वाढत असल्याने टायर फुटण्याची शक्यता असते.समृद्धी महामार्गावरील गाड्या सुसाट वेगाने धावत असतात.त्यामुळे गाडी चालवताना योग्य ती काळजी घेणे जरुरी आहे.