२०२४ ला जनताच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावर बसवणार : सुभाष देसाई
कणकवली : माजी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार करण्यास भाग पाडणाऱ्या शिंदे गटाच्या विरोधात जनतेच्या मनात चिड निर्माण झाली आहे. २०२४ साली ही जनता मतदानाच्या शस्त्राचा वापर करून बेकायदा सत्तेवर आलेले शिंदे – फडणवीस सरकारचा पाडाव करून मविआला बहुमतांनी विजयी करेल आणि पुन्हा मुख्यमंत्री पदी उद्धव ठाकरेच यांना बसवेल, असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. दरम्यान कणकवली येथील मातोश्री हॉल येथे आयोजित शिवसंवाद यात्रेत ते बोलत होते.
यावेळी रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे समन्वयक प्रदीप बोरकर, आ. वैभव नाईक, रत्नागिरी – लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुख नेहा माने, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना नेते संदेश पारकर, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, अतुल रावराणे, युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला आघाडीप्रमुख नीलम पालव, शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, उपतालुकाप्रमुख राजू रावराणे, तालुका संघटक वैदेही गुडेकर, संजना कोलते, माजी उपजिल्हाप्रमुख जयसिंग नाईक, राजु शेट्ये, राजू राणे, युवासेनेचे पदाधिकारी राजू राठोड, दिव्या साळगावकर यांच्यासह सेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

पुढे बोलताना श्री. देसाई म्हणाले, शिवसेनेतील काही मंडळींनी गद्दारी व बेईमानी करून पक्षाचे नाव व चिन्ह चोरले. मात्र, त्यांना ठाकरे ब्रँड चोरता येणार नाही. भाजप हा पक्ष लोकशाहीला बुडविण्याचे काम करीत असून लोकशाहीला वाचवण्यासाठी भाजपच्या विरोधात रान पेटवण्याची गरज निर्माण झाली आहे. २०२४ साली भाजपला रोखण्यासाठी भाजप विरोधी पक्ष एकत्र येत आहेत, ही परिवर्तनाची नांदी ठरणार आहे.
सिंधुदुर्गात शिवसेना संपविण्याची भाषा करणाऱ्या नारायण राणे व त्यांच्या दोन पोरांची प्रतिमा लयास गेली, अशी टीका त्यांनी केली. मी आणि माझी दोन पोरं अशी राणेंची अवस्था झाली असल्याचा आरोपही त्यांनी लगावला. सिंधुदुर्गातील तिन्ही मतदारसंघांत शिवसेनेचा आमदार असतील, असेही ते म्हणाले. आज मातोश्रीवर अनेक निष्ठावांत येत आहेत. आंबेडकर चळवळीपासून कम्युनिस्ट आणि मुस्लिम संघटना तसेच दिल्ली, पंजाब राज्याचे मुख्यमंत्रीही येत आहेत. अनेक राज्याचे मुख्यमंत्री संपर्कात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे न डगमगणारे नेते आहेत. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून यापुढे काम करा असे आवाहन श्री. देसाई यांनी शिवसैनिकांना केले.
पुढे आ. नाईक म्हणाले, ज्या पक्षाचे सहा महिन्यापूर्वी ९० टक्के आमदार, खासदार सोडून गेले आणि त्या पक्षाचं चार दिवसापूर्वी चिन्ह गेलं या पक्षाचं नाव चार दिवसापूर्वी गेलं तरीही लोक शिवसेनेच्या या शिव संवाद मेळाव्याला या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत.


हीच खरी शिवसेनेची ताकद आहे. शिवसेनेचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. अखेरपर्यंत मी उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहीन. पक्षाच्या माध्यमातून अनेक विकास कामे मतदारसंघात आणली आहेत. लोक आपल्या सोबत आहेत. जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या माध्यमातून ४५० कोटीची कामे सुरू केली आहे.
अनेक विकासकामे या जिल्ह्यांमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून झाली. आता आपल्याला संघर्ष करायचा आहे. हा संघर्ष आपल्यासाठी नवा नाही. यश निश्चितच मिळेल. परंतु, प्रत्येकाने प्रामाणिकपणे पक्ष संघटनेसाठी योगदान दिले पाहिजे असे आवाहन आ. नाईक यांनी केले.
पुढे बोलताना श्री. सावंत म्हणाले, गेली काही वर्ष राणेंसोबत असताना आम्ही सुद्धा विकास झाला असं सांगत होतो. पण नरडवे धरण पंचवीस वर्षे झाले नाही असे, सांगत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर खोचक टीका केली. कणकवली येथे शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने आयोजित मेळाव्यात सतीश सावंत बोलत होते.
यावेळी सावंत यांनी बोलताना आ. नितेश राणे यांच्यावरही सडकून टीका केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात रस्ते विकास कसा हवा, व्ही आर नंबर म्हणजे काय? इतर जिल्हा मार्ग म्हणजे काय? किंवा विकास कसा करावा हे आ. नितेश राणेना माहिती नाही. कॉन्ट्रॅक्टरने काम घेतलं की टक्केवारीसाठी नितेश राणे काम करणे हेच केवळ आम. नितेश राणेंचे काम आहे. मात्र येत्या २०२४ च्या निवडणुकिला आ. राणे जसे पटवर्धन चौकात शिवसैनिकांना हसत होते तसेच शिवसैनिक देखील त्याच पटवर्धन चौकात २०२४ च्या पराभवावेळी हसतील असा खळबळजनक आरोप सतीश सावंत यांनी केला या दरम्यान केला आहे.
वैभववाडीतील पदाधिकाऱ्यांना मिळणाऱ्या स्टॉलच्या भाड्यातील हिस्सा आपल्याला मिळत नाही म्हणून स्टॉल हटाव मोहीम राबवल्याचा आरोप देखील श्री. सावंत यांनी केला. पंजाबचे मुख्यमंत्री ओम गणेश वर येणार नाहीत कारण त्यांना मातोश्री ची ताकद माहिती आहे. असा खोचक टोला देखील सतीश सावंत यांनी राणेंना लगावला.
पुढे शिवसेना नेते संदेश पारकर म्हणाले, सुभाष देसाई यांनी शिवगर्जना यात्रेची घोषणा केली. आणि जो प्रतिसाद आपणास वृत्तपत्रांमध्ये पाहिलं सोशल मीडियामध्ये पाहिजे की मोठ्या संख्येने प्रत्येक तालुक्यातील निष्ठावंत शिवसेने उपस्थिती दाखवतो. सुभाष देसाई यांचे विचार ऐकण्यासाठी त्या ठिकाणी लोक पोहोचतात. गेले आठ महिने या राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे जे अनेक संकटात शिवसेनेवर अनेक आघात झाले त्या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा आज उद्धवजींनी मोठ्या मनाने शिवसैनिकाला सांगितलं की तुम्ही स्वतःला खचू देऊ नका तुम्ही जिद्दीने आणि धर्याने शिवसेनेबरोबर थांबा. मी या सगळ्याचं नेतृत्व करतो. आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रमध्ये नव्या दमाने शिवसेना उभी करतो हा आत्मविश्वास उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला आणि शिवसैनिकांना दिला. शिवसेनेला संघर्ष, बंडखोरी नवीन नाही गेल्या अनेक वर्षांमध्ये अनेक नेते शिवसेने मधून फुटून गेले. आणि त्याला तात्पुरता फायदा त्यावेळी झाला. पण आज त्यांची परिस्थिती काय जनमानसातल्या त्यांची प्रतिमा ही पूर्णपणे त्या ठिकाणी लयात गेली.
कणकवली तालुक्याने तीस ते पस्तीस वर्ष संघर्ष केलेला आहे. श्रीधर नाईकसारखं युवा नेतृत्व त्यावेळी त्यांनी काँग्रेसचा खासदार निवडून आणला म्हणून त्यांची दिवसाढवळ्या श्रीधर नाईकांची हत्या झाली. जो इथला कार्यकर्ता श्रीधर नाईक यांच्या विचाराचा होता तो अप प्रवृत्तीच्या विरोधात लढत राहिला. आजही तो त्याच ताकतीने उभा आहे. सत्यविजय भिसे सारखी माणसे अप प्रवृत्तीच्या विरोधात लढत होती. त्यांना त्यांनी संपवण्याचे काम ते त्या ठिकाणी झालं व्यक्ती गेल्या पण त्यांचे विचार त्याच ताकदीने या कणकवली तालुक्यामध्ये उभे आहेत ज्या अपप्रोचा विरोधात आपल्याला लढायचं आहे त्याच्या विरोधात आपण भूमिका आक्रमक घेतली पाहिजे. जनतेचे प्रश्न त्या ठिकाणी हातात घेतले पाहिजे. आणि त्या प्रश्नांची शिवसेनेच्या माध्यमातून सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसेच जनतेला विश्वास देण्याचा प्रयत्न केला “हिजे जर या जिल्ह्याचा विकास करायचा असेल उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली करू शकतात. असा विश्वास जनतेच्या मनामध्ये निर्माण केला पाहिजे. ज्यावेळी आपण हे काम करू त्यावेळी जिल्ह्याच्या सगळ्या सत्ता स्थानावर शिवसेनेचा भगवा फडकणार आहे. असे शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर म्हणाले.
यावेळी कणकवली तालुका शिवसेनेच्यावतीने सुभाष देसाई व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश भोगले यांनी तर आभार सुशांत नाईक यांनी मानले.





