वैभववाडी शहरातील स्टॉल अखेर हटविले…!

वैभववाडी : वैभववाडी शहरात स्टॉल हटवण्याची धडक मोहीम नगरपंचायतने सुरू केली. गुरुवारी सायंकाळपर्यंत नगरपंचायतीने जेसीबीच्या साह्याने बहुतांश स्टॉल हटवले. स्टॉल हटविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज कांबळे रस्त्यावर उतरले होते. दरम्यान पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता. या कारवाईवेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी शहरात गर्दी केली होती. या मोहिमेमुळे वातावरण तणावाचे झाले होते.

गुरुवारी सकाळी 11 वाजता या मोहिमेला सुरुवात झाली होती. परंतु स्टॉलधारकानी आक्रमक पवित्रा घेत हटाव मोहिमेला विरोध केला होता. दरम्यान तीन तास मोहीम थांबवण्यात आली होती. आधी पुनर्वसन करा, नंतर स्टॉल हटवा. असा आक्रमक पवित्र स्टॉल व्यावसाईक यांनी घेतला. त्याचबरोबर संभाजी चौकपासून स्टॉल काढा. नंतरच आमच्या स्टॉलवर जेसीबी फिरवा असा सूर काहीनी लावला. मुख्याधिकारी स्टॉल हटविण्यावर ठाम राहिले होते. मुख्याधिकाऱ्यांनी दोन तास मुदत दिली होती. स्टॉलमधील साहित्य बाजूला करा. हटाव मोहीम ही होणारच आहे. असे त्यांनी सांगितले. त्यानुसार 3 वा.पासून स्टॉल हटाव मोहिमेला सुरुवात झाली आहे. मुख्याधिकारी सुरज कांबळे यांनी जेसीबी सोबत जात दुर्गा माता पटांगणावर असलेला स्टॉलवर पहिली कारवाई केली. तेथील दोन स्टॉल जेसीबीने जमीनदोस्त करण्यात आले. त्यावेळी मात्र स्टॉल धारकानी आपापल्या स्टॉल मध्ये जात साहित्य काढण्यास सुरुवात केली. साहित्य काढून झालेल्या स्टॉलवर जेसीबी चालवण्यात आला. काही व्यावसायिक आपले स्टॉल ट्रॅक्टर मध्ये भरून घरी घेऊन गेले. जमीनदोस्त करण्यात आलेल्या स्टॉलचे भंगार साहित्य पंचायतीने इतरत्र हलविले. काही स्टॉल धारकांना साहित्य बाहेर काढण्यासाठी 20 ते 25 मिनिटे वेळ देण्यात आली होती. त्यावेळेस स्टॉल धारकांनी साहित्य बाहेर काढत पर्यायी जागी हलवले. नगर पंचायतने जवळपास सर्व स्टॉलवर कारवाई केली. स्टॉल, खोके काढण्यात आल्याने दत्त मंदिर परिसर, नगरपंचायत परिसर, दुर्गामाता मैदान परिसर, आरोग्य केंद्र परिसर, बसस्थानक, शासकीय गोडावन परिसर, सुलभ शौचालय परिसर मोकळा झाला आहे. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. कारवाई वेळी नगराध्यक्षा नेहा माईनकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत, बांधकाम सभापती विवेक रावराणे, डॉ. राजेंद्र पाताडे, राजन तांबे, निकम, यामिनी वळवी, स्वीकृत नगरसेवक मनोज सावंत, रणजीत तावडे, अक्षता जैतापकार, नगरसेवक, नगरपंचायत अधिकारी, कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.