ज्येष्ठ कवी-गीतकार जावेद अख्तर यांनी “मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचे सूत्रधार अजूनही पाकिस्तानात मोकाट फिरत आहेत.” असं म्हणत पाकिस्तानला खडेबोल सुनावले. लाहोरमध्ये नुकत्याच झालेल्या ‘फैज उत्सवा’त एका प्रश्नाचे उत्तर देताना अख्तर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना वरील विधान केलं. जावेद अख्तर यांच्या या कृतीवरून ठाकरे गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मोदींना टोला लगावल्याचेही दिसून आले आहे.
“इथे बसून पाकिस्तानला सुका दम देणं… ठीक है होता है. पण तिकडे जाऊन बोलण्याची हिंमत दाखवणं याला ५६ इंचापेक्षाही मोठी छाती आहे, असं मी मानतो.” असं संजय राऊत म्हणाले आहेत.





