26 फेब्रुवारी रोजी डोंबिवलीत 57 व्या वार्षिक संमेलनात होणार पुरस्कार वितरण…
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कवयित्री सरिता पवार यांच्या “राखायला हवी निजखूण” या काव्यसंग्रहास काव्यरसिक मंडळ डोंबिवलीचा राज्यस्तरीय कै. अनिल साठे स्मृती काव्य उन्मेष पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कवयित्री हर्षदा सुंठणकर यांच्या “कपडे वाळत घालणारी बाई” या काव्यसंग्रहाला हा पुरस्कार विभागून देण्यात आला आहे.
1966 साली स्थापन झालेल्या काव्यरसिक मंडळ डोंबिवलीचे 57 वे वार्षिक संमेलन संमेलनाध्यक्ष कवयित्री जयश्री हरी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून यावेळी पुरस्कार वितरण केले जाणार आहे. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. राजगृह प्रकाशनने प्रकाशित केलेला कवयित्री सरिता पवार यांचा राखायला हवी निजखूण हा काव्यसंग्रह महाराष्ट्रातील अनेक ख्यातनाम समीक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
सर्वसामान्य वाचकांचीही काव्यसंग्रहाला भरभरून दाद मिळत आहे. मानवमुक्तीचा गजर करत सकल मानवतेला साद घालणारा काव्यसंग्रह असा ठसा “राखायला हवी निजखूण” काव्यसंग्रहाने मराठी साहित्य विश्वात उमटवला असून अल्पावधीतच वाचकांची पसंती काव्यसंग्रहाने मिळवली आहे.





