पत्रकार भवन उद्घाटन निमित्त देवेंद्र फडणवीस यांनी पाठवला शुभेच्छा संदेश…!

सिंधुदुर्गनगरी : आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक पत्रकार भवन सिंधुदुर्गनगरी येथे उभारण्यात आले आहे . या पत्रकार भवनाच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या कार्यव्यस्ततेमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहू शकले नाहीत . मात्र त्यांनी सिंधुदुर्ग मधील पत्रकारांना पुढील शुभेच्छा संदेश पाठवला आहे.

शुभेच्छा..!

“सिंधुदुर्ग पत्रकार संघाच्या वतीने आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक आणि पत्रकार भवनाचे आज उद्घाटन होत आहे, ही अतिशय आनंदाची बाब आहे. बाळशास्त्री जांभेकरांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित केलात, याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन..!

बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील जे पहिले वर्तमानपत्र काढले, त्याचे नाव ‘दर्पण’ होते. म्हणूनच त्यांना दर्पणकार सुद्धा म्हटले जाते. हे नाव देताना पत्रकारितेबद्दल त्यांच्या मनात जे भाव होते, ते या नावातूनच स्वयंस्पष्ट होतात. पत्रकारिता कशी असली पाहिली, तर ती आरशासारखीच असली पाहिजे. आरसा कधीच खोटे बोलत नाही. आरशासमोर जी वस्तु न्याल किंवा जो चेहरा न्याल, त्याचे हुबेहुब प्रतिबिंब त्यात दिसते. आज पत्रकारितेकडूनही तोच भाव अपेक्षित आहे. घडलेली घटना जशीच्या तशी दाखविणे आणि जशी एक बाजू आहे तशी दुसरी बाजू सुद्धा दाखविणे आणि दोन्ही बाजू ऐकून जनतेला त्यांचे स्वतःचे मत तयार करता यावे, यासाठी लोकशाहीला अभिप्रेत व्यासपीठ तयार करुन देण्याचे काम माध्यमांकडून अपेक्षित आहे. हे व्यासपीठ अन्य कुठल्याही बाबींनी प्रभावित नसावे, हाच आरशामागचा खरा भाव आहे.

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन करताना हाच भाव अपेक्षित आहे. त्यांच्या नावाने तयार होणाऱ्या या नव्या वास्तुत ही सत्याची साधना होईल, अशी मला पूर्ण खात्री आहे. मी सर्व पत्रकार बंधू-भगिनींना या उदघाटनाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो.”