सिव्हिल सर्जनकडून उपजिल्हा रुग्णालय कणकवलीची पाहाणी | पाच दिवसात रिक्त पदे भरणार

121

रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेत आ. नितेश राणे यांनी केला होता पाठपुरावा…

कणकवली : मागील काही दिवसांपासून कणकवली उपजिल्हा रुग्णालयमध्ये डॉक्टर, नर्स, कर्मचारी, अधिकारी ही पदे रिक्त होती. त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत होती. अखेर काही दिवसापासून रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. याबाबतची माहिती मिळताच आ. नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून याबाबतची माहिती दिली होती.

त्यानुसार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागरगोजे यांच्याशी मोबाईलवर सविस्तर चर्चा करत उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आज दुपारी सिव्हिल सर्जन डॉ नागरगोजे, अतिरिक्त सिव्हिल सर्जन डॉ इंगळे यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला तातडीने भेट देत पाहणी केली.

वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागनाथ धर्माधिकारी यांनी सीएस डॉ नागरगोजे आणि एसीएस डॉ इंगळे यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रिक्त असलेल्या वैद्यकीय अधिकारी तसेच अन्य सहकारी स्टाफबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यामुळे जनतेला हव्या तितक्या वैद्यकीय सुविधा देण्यावर निर्बंध येत असल्याचे सांगितले. सोबतच ऑपरेशन थिएटरमधील अत्यावश्यक सी आर्म सुद्धा तात्काळ उपलब्ध करून देण्यात येईल असेही सीएस डॉ नागरगोजे यांनी सांगितले. यावेळी डॉ धनंजय रासम, मेट्रेन सायली तिवरेकर, वरिष्ठ औषध निर्माण अधिकारी प्रिती कोरगावकर उपस्थित होते.