सावंतवाडी : श्री वंसदेव ब्राम्हण कला क्रीडा मंडळ सातोसे – रेखवाडी क्रिकेट स्पर्धेत रुची स्पोर्ट्स मळेवाड संघाने अजिंक्यपद पटकाविले आहे.
सातोसे – रेखवाडी येथील श्री वंसदेव ब्राम्हण कला क्रीडा मंडळ आयोजित ६ षटकांच्या एक गाव एक संघ भव्य स्पर्धेत रुची स्पोर्ट्स मळेवाड संघाने एम एस आर टी स्पोर्ट्स तुळस संघावर एकतर्फी मात करून अजिंक्यपद पटकाविले.
यावेळी शिवजयंतीचे औचित्य साधून श्री छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या प्रतिमेस पत्रकार तथा सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानचे सावंतवाडी – दोडामार्ग – वेंगुर्ला विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला. यावेळी जगन्नाथ पंडित सरांनी स्पर्धा उत्कृष्टरित्या यशस्वी केल्याबद्दल रेखवाडीतील कायकर्त्यांचे कौतुक केले. तर संजय पिळणकर यांनी रक्तदान चळवळीतही येथील कार्यकर्त्यांनी पुढे यावे असे आवाहन केले.
ही क्रिकेट स्पर्धा लीग पद्धतीने दोन गटात घेण्यात आली.शुक्रवार दि.१६ फेब्रुवारी २०२३ पासून तीन दिवस घेण्यात आलेल्या या स्पर्धेत एकूण १६ संघांनी सहभाग घेतला.
पहिल्या उपांत्य फेरीत तुळस संघाने रॉयल चॅलेंजर्स कोनाडी संघावर मात केली तर दुसऱ्या उपांत्य फेरीत रुची स्पोर्ट्स मळेवाड संघाने जय हनुमान आरोस संघावर मात करून अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत अमेय रेडकरच्या तडाखेबंद ४० धावांच्या जोरावर ६ षटकात ७५ धावांचे लक्ष तुळस संघाला दिले ते त्यांना पेलवले नाही. मळेवाड संघ १८ धावांनी विजयी झाला.
स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज अमेय रेडकर, उत्कृष्ट गोलंदाज आदित्य बेहेरे, स्टायलिश खेळाडू केतन सातोसकर, तर मालिकावीर म्हणून लक्ष्मण नाईक यांची निवड करण्यात आली. स्पर्धेत पंच म्हणून मकरंद मांजरेकर व अमित रेडकर यांनी काम पाहिले तर समालोचन सावळाराम शिरोडकर व प्रवीण कवठणकर यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर सातोसे माजी सरपंच बबन सातोसकर, जगन्नाथ पंडितसर, अशोक पंडित सर, शैलेश पंडित, पांडुरंग पंडित, बबन पंडित आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी पंडित यांनी केले तर आभार प्रवीण कवठणकर यांनी मानले.





