नवी दिल्ली : शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. निवडणूक आयोगाचा हा निर्णय चुकीचा असून त्यांनी अनेक मुद्द्यांकडे दुर्लक्ष केल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. या याचिकेवर तातडीने सुनावणी घेऊन निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. उद्या या प्रकरणावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
ठाकरे गटाच्या याचिकेत काही महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने चिन्ह आणि पक्षाचं नाव हिरावून घेण्याचा घेतलेला निर्णय लोकशाही मार्गाने घेतलेला नाही. 2018 ची पक्षाची कार्यकारिणी ही पक्षाच्या घटनेप्रमाणे आहे. पक्षाचे बहुतांश सदस्य आमच्या बाजूने आहेत. निवडणूक आयोगाने केवळ आमदार आणि खासदारांच्या संख्येच्या आधारे निर्णय दिला आहे. हा निर्णय योग्य नाही, असा दावाही या याचिकेत करण्यात आला आहे.





