

सावंतवाडी : छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक विचार आहे. तो अखंड तेवत ठेवण्यासाठी मातृभूमी शिक्षण संस्थेने शिव संस्कार या नावाचा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. महाराजांचे विचार, जिजाऊंचे संस्कार आणि तो सुवर्ण शिवकाळ उमलत्यात पिढीच्या मना मनात रुजावा त्या विचारांचे सातत्याने मंथन व्हावे आणि सशक्त मनाची पिढी शिव विचारांचा अमूल्य ठेवा घेऊन या समाजात वावरावी.
या उदात्त हेतूने मातृभूमी शिक्षण संस्थेने हे पाऊल उचललेले आहे. समाजात आत्ता होत असलेले अत्याचार, आचार-विचार पाहिले. शिव विचार ही काळाची गरज बनली आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणण्यापलीकडे महाराज समजावे प्रत्येक मुलाच्या मनात उमजावे. शिवजयंती ही एका दिवसाची नसून 365 दिवसही शिवमहाराजांचे विचार जागृत राहावे हे आपल्या शिवसंस्कारचे प्रमुख उद्दिष्ट होय.
शिवसंस्कारच्या स्पर्धेकडे प्रत्येक शिवभक्ताने केवळ स्पर्धा म्हणून पाहू नये शिवकार्य म्हणून प्रत्येकाने यात मोलाचा वाटा घ्यावा. स्पर्धा म्हणजे निमित्त आहे. म्हणूनच वर्षभरामध्ये ऐतिहासिक घटनांना उजाळा देऊन आत्ताच्या समाजाला योग्य दिशा मिळावी हा प्रयत्न संस्था करीत आहे.महाराजांच्या जिवलग मावळ्यांचा पराक्रम ही मुलांना अभ्यासता येईल.





