बापर्डे रेडेटाका येथे सापडली सर्वात मोठी विलक्षण मानवाकृती…!

160

देवगड : देवगड तालुक्यातील बापर्डे, रेडेटाका येथील कातळचित्र हे सुरेख देखणे असून ते आतापर्यंत खुप प्रसिध्द झाले आहे. दोन तिन वर्षापुर्वी हे कातळचित्र देवगडच्या इतिहास संशोधन मंडळाला आढळले होते. त्यानंतर सातत्याने या कातळचित्राचा अभ्यास करण्यासाठी व इतर अभ्यासकांना दाखवण्यासाठी रणजित हिर्लेकर व अजित टाककर हे या भागात असत. चारच दिवसांपुर्वी पाळेकर वाडी येथील काही नवीन सापडलेल्या कातळ चित्रांचा अभ्यास करण्यासाठी ते गेले होते. परत येत असताना बापर्डे येथील एका घराच्या अंगणातील कातळशिल्प पहाण्यास गेले असता सायंकाळी साडे सहा वाजता काळोख पडत असताना त्यांना श्री. श्रीकांत नाईकधुरे यांच्या कलमाच्या बागेत एक विलक्षण कातळ शिल्प पहायला मिळाले.

कोकणातील कातळचित्राच्या दुनियेत हे कातळचित्र अतिशय वेगळे आहे. हे लक्षात येताच लगेचच या कातळचित्रांची साफसफाई व डाँक्युमेंटेशन करण्यासाठी नाईकधुरे यांच्याशी बोलुन टाककर व हिर्लेकर यांनी नव्या मोहीमेची योजना केली. या कामी साक्षी राणे, गौरव सोमले व निना हिर्लेकर या देवगड काँलेजच्या विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

या कातळचित्राविषयी माहीती देताना प्राच्यविद्या अभ्यासक रणजित हिर्लेकर म्हणाले, “हा जवळपास विस ते पंचविस कातळचित्रांचा एकत्रित समुह आहे. यातील मानवाकृती कातळचित्र हे आतापर्यंत सापडलेल्या सर्व मानवाकृतींमधे अतिशय विलक्षण व अलंकार तोरणांनी अलंकृत आहे. जवळपास पंधरा ते सहा फुट रुंदीच्या आयाताकृती चौरसात सर्व जागा व्यापेल अशी ही मानवाकृती आहे. आतापर्यंत देवगड तालुक्यात सापडलेल्या मानवाकृती कातळचित्रात ही सर्वात मोठी मानवाकृती आहे. ही संपुर्ण फेम विविध प्रकारे सजवली नटवली आहे. पहाताक्षणी मानवी मनाला धक्का बसेल व ही भव्याकृती पाहुन तो त्यापुढे नम्र होईल, इतकी विलक्षण मोठी ही आकृती आहे. आजवरच्या कातळचित्रां विषयीच्या संशोधनाला धक्का देईल, इतके वेगळेपण या आकृतीत पहायला मिळते. जवळ पास चाळीस ते पन्नास चौरस फुटात ही विविध कातळचित्रे कोरलेली आहेत. ही सर्वच कातळचित्रे आतापर्यंत दिसणाऱ्या कातळचित्रांपेक्षा वेगळी आहेत.”

देवगड इतिहास संशोधन मंडळाने केलेल्या कातळचित्र संशोधन व संवर्धनाच्या कामाबाबत माहीती देताना श्री. अजित टाककर म्हणाले, “गेल्या वर्षभरात आम्हाला तिस ते चाळीस नविन कातळचित्रे सापडली आहेत. आता देवगड तालुक्यात सोळा- सतरा ठिकाणी साठ पासष्टहुन अधिक कातळचित्रांची नोंद आम्ही घेतली आहे. या विषयीचा रिपोर्ट व संशोधन लेख येत्या १७ फेब्रुवारी रोजी ठाणे येथील ज्ञानसाधना महाविद्यालयात भरणाऱ्या कोकण इतिहास परीषदेच्या बाराव्या राष्ट्रीय अधिवेशनात सादर केला जाणार आहे.”

या कातळचित्रांची व्यवस्थित साफसफाई करुन त्याचे फोटो काढण्यात आले, त्यांची निट मोजमापे घेऊन रेखाचित्रे करण्यात आली आहेत. या संशोधन मोहीमेत रणजित हिर्लेकर अजित टाककर साक्षी राणे, गौरव सोमले, निना हिर्लेकर आदी काँलेज विद्यार्थी सहभागी होते. या कामी श्रीकांत नाईकधुरे यांनी आवश्यक ते सर्व सहकार्य केले. संशोधन मंडळाच्या वतीने केलेल्या विनंतीला मान देऊन लवकरच या कातळचित्रांभोवती चिऱ्यांचे कंपाउड करुन त्याचे संरक्षण करु अले आश्वासनही त्यांनी दिले.