सिंधुदुर्ग | सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणातील महत्त्वाचे केंद्र असलेल्या कणकवली नगरपंचायतीची निवडणूक २ डिसेंबर रोजी पार पडली. नियोजित वेळेनुसार ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार होती; मात्र न्यायालयाच्या आदेशामुळे ही मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होत आहे. त्यामुळे या निकालाकडे जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
या निवडणुकीत भाजपला आव्हान देण्यासाठी ‘शहर विकास आघाडी’ या नव्या राजकीय आघाडीची निर्मिती करण्यात आली होती. या आघाडीमध्ये ठाकरे गटाची शिवसेना,शिंदे शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस, शरद पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस तसेच इतर घटक पक्ष सहभागी झाले होते. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे कुडाळ– मालवणचे आमदार निलेश राणे यांनी या निवडणुकीवर विशेष लक्ष केंद्रित केल्याने कणकवलीची लढत राज्यपातळीवर चर्चेत आली.
या निवडणुकीत एका बाजूला पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजप, तर दुसऱ्या बाजूला शहर विकास आघाडी अशी स्पष्ट राजकीय विभागणी पाहायला मिळाली. त्यामुळे ‘राणे विरुद्ध राणे’ असा राजकीय संदर्भ या निवडणुकीला लाभला असून, निकालातून जिल्ह्यातील राजकीय समीकरणे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
शहर विकास आघाडीच्या प्रचारात माजी आमदार राजन तेली, उबाठा शिवसेनेचे विधानसभा प्रमुख सतीश सावंत, संदेश पारकर, सुशांत नाईक, शिंदे गटाचे संजय आंग्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनंत पिळणकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी सक्रिय होते. या आघाडीने सत्ताधाऱ्यांवर विविध मुद्द्यांवरून टीका केली.
भाजपकडून मोठ्या जाहीर सभा न होता पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीतून शक्तिप्रदर्शन करण्यात आले. तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांची कणकवलीत जाहीर सभा झाली. खासदार नारायण राणे हेही कणकवलीत उपस्थित होते; मात्र दोन पक्षाच्या बाजूने दोन्ही सुपुत्र निवडणूक प्रक्रियेत सक्रिय असल्याने त्यांनी प्रचारापासून काहीसे अंतर ठेवले.
मागील कणकवली नगरपंचायत निवडणुकीत समीर नलावडे यांनी संदेश पारकर यांचा ३४ मतांनी पराभव केला होता. यावेळी मात्र मतविभागणी टाळण्यासाठी ‘शहर विकास आघाडी’चा नवा फॉर्म्युला राबवण्यात आला आहे.त्यामुळे आता या निकालानंतर कणकवलीचा नगराध्यक्ष कोण होणार, हे स्पष्ट होणार असून समीर नलावडे पुन्हा विजय मिळवणार की संदेश पारकर पुनरागमन करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





