देवगड ( प्रतिनिधी)
देवगडमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यशाळा
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत देवगड तालुक्यातील कार्यशाळेचे आयोजन १२ सप्टेंबर २०२५ रोजी करण्यात आले आहे. इंदप्रस्थ सभागृह देवगड येथे होणाऱ्या या कार्यशाळेत सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, सदस्य, कर्मचारी, ग्रामरोजगार सेवक, पर्यवेक्षक तसेच तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी दिली.
महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचा उद्देश स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढविणे हा आहे. उत्कृष्ट ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदा यांचा सन्मान करण्यासाठी सन २०२५-२६ पासून तालुका, जिल्हा, विभाग व राज्य अशा चार स्तरावर प्रोत्साहन दिले जाणार आहे.
देवगड तालुक्यातील एकूण ७२ ग्रामपंचायतींमध्ये हे अभियान राबविण्यात येणार असून, १ ऑगस्ट २०२५ पासून याबाबत नियोजन सुरू झाले आहे. प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर तीन ग्रामसभा घेण्यात येणार असून, त्यातील पहिली ग्रामसभा १७ सप्टेंबर रोजी मतदारांच्या बहुसंख्य उपस्थितीत होणार आहे. यासाठी तालुकास्तरावरून संपर्क अधिकारी व पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच ग्रामस्तरीय समित्याही स्थापन होणार आहेत.
अभियानाच्या कालावधीत रोजचे अहवाल संबंधित App वर पाठविण्यात येणार आहेत. १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत अभियान राबवले जाणार असून, यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल.
या अभियानाचे मुख्य घटक म्हणजे सुशासन, सक्षम पंचायत, जलसमृद्ध व हरीतगाव, योजनांचे अभिसरण, गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण, उपजीविका विकास, सामाजिक न्याय, लोकसहभाग व श्रमदान हे आहेत. देवगड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये हा उपक्रम प्रभावीपणे राबविला जाणार असल्याचे गटविकास अधिकारी यांनी सांगितले.





